खाद्यमेळाव्यातून विद्यार्थ्यांना मिळाला व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव

भारतीय विद्यानिकेतन शाळेत खाद्य मेळावा

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन शाळेत नुकतेच खाद्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


  
या खाद्य मेळाव्याचे उद्‌घाटन संस्थेच्या सचिव आरती राव यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, तेजल कोळसे-पाटील, स्वाती तोडकर, ज्योती मोरे, किर्ती शिंपी आदींसह शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आरती राव म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना ‘ना नफा ना तोटा’ संकल्पना आत्मसात व्हाव्यात, कष्टातून पैसे कमावण्याची सवय लागावी, विद्यार्थ्यांना दैनंदिन पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवसायातील व्यवहारज्ञान यावे, तसेच व्यापारी गुणांचे कौशल्य प्राप्त व्हावे, या उद्देशाने खाद्यमेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थाचे स्टॉल लावले होते. ग्राहक आकर्षित होण्यासाठी आकर्षक सजावटही करण्यात आली होती. मेळाव्यासाठी ग्राहक म्हणून शाळेतीलच विद्यार्थी, शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी होते. विद्यार्थ्यांनी खाद्य पदार्थांचा भरभरून आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्याचे शिक्षकांनी भरभरून कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.