गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

शिवली गावात सुवर्ण महोत्सवी सव्वा महिना ज्ञानसत्र सप्ताह उत्साहात

एमपीसी न्यूज – मावळातील शिवली गावाने सुवर्ण महोत्सवी सव्वा महिना ज्ञानसत्र सप्ताहाचे आयोजन केले आहे. धार्मिक व सांप्रदायिक परंपरा संस्कृतीचे जतन करून गावात सामाजिक सलोखा व एकात्मता राखत त्याची कायम मुहूर्तमोढ रोवली गेली आहे. सध्याच्या धावपळीच्या व वाढत्या चंगळवादी युगात सव्वा महिना अखंड हरिनाम सप्ताहाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या शिवली गाव व ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सव्वा महिना सप्ताहात रोज सकाळी साडेसात वाजता विष्णूसहस्त्रनाम, सकाळी 8 ते दुपारी 12 अखंड हरिनाम पारायण, दुपारी 12 ते 1 भोजन, दुपारी 4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 7 ते 9 किर्तन, रात्री 9 ते 10 भोजन व त्यानंतर पहाटे 4 पर्यंत हरिनाम जागर आणि पहाटे 4 ते 6 काकडाआरती भजन अशाप्रकारे दैनंदिनी हरिनाम नित्यपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. रोज शिवली व पंचक्रोशी आणि मावळातील अनेक वारकरी व भाविक या हरिनामाचा लाभ घेत असून, रोज 2 ते अडीच क्विंटलचे अन्नदान व महाप्रसादाचे वाटप  करण्यात येत आहे.

सध्या युवापिढी ही आपल्या परंपरा आणि संस्कृतीपासून वेगळ्या मार्गावर भरकटत चाललेली आहे. सध्याच्या व भावी युवापिढीला सामाजिक, शैक्षणिक, कलाक्रीडा आणि सांप्रदायिक व धार्मिक परंपरा व संस्कृतीची आवड व्हावी तसेच त्यांच्याकडून अशाप्रकारच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन व्हावे आणि त्या माध्यमातून सुसंवाद, वैचारिक मंथन, सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता साधावी यासह हरिनामाची रुची निर्माण व्हावी. हाच मुख्य हेतू असल्याचे शिवली ग्रामस्थांनी सांगितले आहे.

या सप्ताहला 11 फेब्रुवारीला ढोल-ताशांच्या निनादात व टाळ मृदूंगाच्या गजरात  दिंडीची भव्य मिरवणूक काढून सुरुवात झाली. या दिवसांपासून गावात घरोघरी गुढी उभारण्यात आली आहे. 21 मार्चला ग्रामदैवत श्री. भैरवनाथ महाराज यांच्या यात्रेच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

Latest news
Related news