द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत पाण्याच्या शोधात भटकंती करत असलेल्या एका साडेआठ वर्षीय नर बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) सकाळी सातच्या सुमारास ओझर्डे (ता.मावळ) हद्दीत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उघडकीस आली.

 

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक वन संरक्षक एम.बी. तेलंग, वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले, विलास गायकवाड, मंगेश सपकाळे, शांताराम भुंडे, शिवाजी भुंडे, सुभाष शेडे, बबन शिंदे, कोंडीबा जांभूळकर, गफूर शेख, अंकुश येवले, अंबू पवार आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

 

बिबट्याचे वय, साडेआठ वर्ष, वजन 70 किलो, उंची दोन फूट चार इंच, लांबी डोक्यापासून शेपटीपर्यंत 6 फूट, 5 इंच, मानेचा घेर 21 इंच, बिबट्याचा उजव्या पायाला जुनी जखमेची खूण असे या बिबट्याचे वर्णन होते. घटनास्थळाचा पंचनामा करून बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कामशेत (मावळ) येथील पशु वैद्यकीय दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी डॉ. रुपाली दडके यांनी केले. अपघातात बिबट्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गंभीर जखम झाल्याने मेंदूत रक्तस्राव होऊन बिबट्याचा मृत्यू झाला, असे दडके यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.

 

दरम्यान, वनविभागाच्या ढिसाळ कारभाराने वन्यजीवांचे बळी जात असून आणखी किती बळींची प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल वन्यजीव मित्रांनी उपस्थित केला आहे. तसेच वनविभागाच्या कार्यक्षमतेवर वन्यजीव मित्र व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

 

अन्न व पाण्याची अपुरी सोय, आयआरबीचे दुर्लक्ष, वन्य क्षेत्रात लागणारे वनवे यांमुळे वन्यजीव संवर्धन आव्हानात्मक – सोमनाथ ताकवले

 

घटनेप्रकरणी वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले म्हणाले की, मावळ तालुक्यातील वनपरिक्षेत्र हद्दीत जुना द्रुतगती व रेल्वे मार्ग आहे. वनक्षेत्राच्या हद्दीत वन्यजीवांना मुबलक अन्न व पाण्याची सोय नसल्याने त्यांची अन्न व पाण्यासाठी भटकंती सुरू होते.

 

त्यातच वनक्षेत्राच्या हद्दीत सीमा भिंती नसल्याने वन्यजीव सहज भटकंती करताना जुना द्रुतगती व रेल्वे मार्ग मध्येच आल्याने त्यांचे अपघात होऊन प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. तसेच वन्यजीवांच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे. वनक्षेत्राच्या हद्दीतून जाणा-या जुना द्रुतगती व रेल्वे मार्गाच्या दुतर्फा उंच कुंपण उभारावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच आयआरबीचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत 1995 साली उभारलेल्या लोखंडी जाळ्याचे कुंपण जीर्ण झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यातच वनक्षेत्रात लागणारे वनव्यांमुळे देखील वन व वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. तसेच अपूर्ण मनुष्यबळ, वनक्षेत्राचा विस्तार पाहता, वन, वन्यजीव संरक्षण व संवर्धन एक आव्हान झाले आहे, असेही ते म्हणाले. 

 

वन्यजीव मित्र अतुल वायकर म्हणाले की, वनक्षेत्रात दिवसेंदिवस लागणारे वनवे, वन्यजीवांच्या शिकारी, वनविभागाची उदासीनता, वनक्षेत्रात वन्यजीव संवर्धनासाठी सुविधांचा अभाव, धनिक व बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण आदींमुळे एकेकाळी वन्य व वन्यजीव संपत्तीने समृद्ध असलेल्या मावळ तालुक्यातील वनक्षेत्र ओसाड होत आहे. पर्यावरणाचा -हास होत आहे. अन्न व पाण्याच्या शोधात भटकंती करणा-या बिबट्या, ससे, हरीण, सांबर, कोळे, उदमांजर, रानमांजर, खवलेमांजर, सायाळ, मोर, वानर, रानडुक्कर या वन्यजीवांचा जुना, द्रुतगती व रेल्वे मार्ग आल्याने वाहनच्या धडकेत मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

 

वनस्पती मित्र शंकर पडवळ म्हणाले की, मावळ तालुक्यातील डोंगरावाडी (उर्से ता. मावळ) येथे जुलै 2002 साली शाळेला जाणारा सीताराम कान्हू नवघणे (वय 13) याच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना आणखी डोंगरवाडीतील नागरिक विसरले नाहीत. महामार्गावर बिबट्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने वनसंरक्षक समित्या गठीत करून वाढते वनवे व शिकारी रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.