टाटा मोटर्समधील नोकरीनंतर सांभाळणार नगरसेवकपदाची जबाबदारी – सारिका बो-हाडे

एमपीसी न्यूज – माहेरी सर्वसामान्य कुटुंबातील, वातावरण वडील टाटा मोटर्समध्ये त्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातच उच्च पदवीचे शिक्षण घेतले. पुढे टाटा मोटर्समध्येच नोकरीही चालू केली, मात्र सासरी आल्यानंतर पतीची समाजसेवा विषयक कामे, त्यात निर्माण झालेली आवड व 2017 साली नगरसेवक होण्याची संधी आणि त्यात मिळालेला विजय या सा-यामुळे अगदी काही दिवसात जिवन जगण्याची माझी पद्धतच बदलली, अशी भावना सारिका सस्ते (बो-हाडे) यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना व्यक्त केली.

सारिका सस्ते (बो-हाडे) यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपातर्फे लढवली. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले. यासा-या प्रवासाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, माझे माहेर मोशीचे आहे, माझे बाबा टाटा मोटर्समध्येच नोकरी करत होते. त्यांचे 2010 साली निधन झाले. दरम्यानच्या काळात मी कंम्प्युटर फिल्डमध्ये डिप्लोमा केला तसेच एचआर क्षेत्रात पदवीव्युत्तर शिक्षण घेतले. त्यामुळे मी टाटा मोटर्समध्ये रुजू झाले. लग्नाआधी पासून करत असलेली नोकरी मी लग्नानंतरही करत होते. मात्र सासरी माझे पती वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत होते. त्यात मला आवड निर्माण झाली. हळूहळू मी त्यामध्ये सहभागीही व्हायला लागले. त्यानंतर यावर्षी मला थेट महापालिका निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. पतीच्या साथीने मी जनसंपर्क व प्रचाराला सुरुवात केली. आमदार महेश लांडगे यांनी संधी दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली  पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले. 

या सा-यात मी सात वर्षापासून करत असलेली नोकरी मला सोडावी लागली. त्यामुळे मनात थोडी खंत आहे मात्र काही मिळविण्यासाठी काही सोडावे लागते त्यामुळे माझ्या आयुष्यातील हा बदल मी स्वीकारला आहे, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेतील पहिल्या अनुभवाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, महापालिकेला किंबहूना राजकारणालाच मी पहिल्यांदा जवळून पाहत आहे. मला भीती नाही तर उलट याची उत्सुकता आहे. कारण मला नवीन गोष्टी करायला खूप आवडतात. मी ते एक आव्हान म्हणून स्वीकारत आहे. अर्थात यामुळे माझा पूर्वीचा सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंतचा दिनक्रम होता तो बदलला आहे. आता काळवेळ काहीच असे ठरवून कामे होत नाहीत. कारण मी पूर्वी जनता म्हणून जगत होते आता त्याच जनतेचा प्रतिनिधी म्हणून मला काम करायचे आहे. मी माझ्या कामात महिलांच्या कामांना प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर कचरा, पाणी प्रश्नासाठीही माझे विषेश प्रयत्न असतील, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.