रामदास स्वामी हे कवी म्हणूनही समर्थ – डॉ. समीता टिल्लू

‘रसिक मित्रमंडळ’च्या ‘एक कवी, एक भाषा’ व्याख्यानमालेला रसिकांचा चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – ‘आरती, श्लोक, कविता, सवाया, ओव्या लिहिणारे आणि त्यातून सुभाषितवजा जीवनतत्त्वज्ञाची पाखरण करणारे रामदास स्वामी हे कवी म्हणूनदेखील समर्थ होते’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. समीता टिल्लू यांनी केले. 

‘रसिक मित्र मंडळ’ च्या ‘एक कवी -एक भाषा’ या मासिक व्याख्यानमालेत शुक्रवारी सायंकाळी 47 वे व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. पुणे श्रमिक पत्रकार संघात हे व्याख्यान झाले. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

डॉ. समीता टिल्लू म्हणाल्या की, रामदास स्वामी हे आत्मसाक्षात्कारी संत होते. त्यांनी कविता, श्लोक, सवाया, आरत्या, ओव्या, लावणीही लिहिली. युद्धकांड, सुंदरकांड लिहिले. त्यांच्या लिखाणातून सुभाषितवजा जीवन तत्वज्ञानाची पाखरण झाली. काव्य आणि तत्त्वज्ञान हातात हात घालून चालताना त्यांच्या काव्यातून दिसते. ते कवी म्हणून समर्थ होते.

‘राखावी बहुतांची अंतरे’, ‘मरणाचे स्मरण असावे,’ ‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे’ अशा सुभाषितवजा ओळींपासून ‘सुखकर्ता दुखहर्ता’, ‘लवथवती विक्राळा’सारख्या 61 आरत्या लिहिल्या. करुणाष्टके लिहिली. लोकशिक्षण केले आणि जीवनदृष्टीही दिली. ही जीवनदृष्टी 350 वर्षानंतरही उपयोगी पडते.

अद्वैत-वेदांत तत्त्वज्ञान समर्थांच्या लिखाणात आढळते आणि रसांचा परिपोषही दिसतो. ‘कवी म्हणजे शब्दसृष्टीचे ईश्वर’ हे  त्यांचे शब्द त्यांनीच खरे केले, असेही डॉ. समीता टिल्लू यांनी व्याख्यानात सांगितले.

रसिक मित्रमंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांच्या हस्ते डॉ. समीता टिल्लू यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रकाश कामत यांनी प्रास्तविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.