शिवनेरी स्मारक समितीतर्फे शिवनेरीवर शिवजयंती उत्सव

ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांची उपस्थिती; सवाद्य छबिना मिरवणूक

एमपीसी न्यूज – श्री शिवनेरी स्मारक समितीतर्फे किल्ले शिवनेरी येथे फाल्गून वद्य तृतिया म्हणजेच शिवतृतियेला बुधवार, दिनांक 15 मार्चला सकाळी 7.00 वाजता शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे. यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सपत्नीक श्री शिवाई देवीची पूजा करणार आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.

कै. ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि कै. शाहीर किसनराव हिंगे यांनी 1980 सालापासून शिवनेरी गडावर हा उत्सव सुरू केलेला आहे. तीच परंपरा पुढे चालू ठेवत बुधवारी श्री शिवाई मंदिर ते जन्मस्थळ अशी महाराजांच्या प्रतिमेची चांदीच्या शिवपालखीतून सवाद्य छबिना मिरवणूक निघेल. अखिल भारतीय वारकरी संप्रदाय ठाणे जिल्हयातील वारक-यांची दिंडी मिरवणुकीत सहभागी होणार आहे.

हेमंतराजे मावळे म्हणाले की, शिवजन्मस्थळावर पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील महिला पाळणा म्हणून शिवजन्म साजरा करतील. त्यानंतर ध्वजारोहण होऊन शिवकुंजावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे शाहीर गणेशदादा टोकेकर व सहकारी पोवाडा सादर करणार आहेत. एकनाथ वाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या पूनम मनसूख यांना यावर्षीचा राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनात कार्याध्यक्ष मधुकर काजळे, रमेश खत्री, रमेश कर्पे, गणेश कोरे यांनी सहभाग घेतला आहे.

शिवजयंतीनिमित्त गडावर येणा-या वाहनांचा टोल माफ करा

श्री शिवजयंती उत्सवानिमित्त किल्ले शिवनेरी व अन्य गडांवरुन विविध मंडळे शिवज्योत घेऊन जातात. त्यामुळे दिनांक 14 व 15 मार्च रोजी पुणे जिल्हयातील टोल नाक्यांवर श्री शिवजयंती उत्सवातील वाहनांना टोल माफी करावी, अशी मागणी श्री शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंतराजे मावळे यांनी पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. मागील वर्षी शिवजयंतीनिमित्त टोल माफी देण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.