शेती, समाजकार्य आणि आता नगरसेविका; संगीता ताम्हाणे यांचा प्रवास

एमपीसी न्यूज – शेती करत समाजकार्य करण्यास सुरुवात केली. बचत गट सुरु केले. त्याच्या माध्यमातून महिलांशी संपर्क वाढला. यंदाच्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि संगीता ताम्हाणे यांनी विद्यमान नगरसेविका असलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करत विजय खेचून आणला…… 
 

प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, त्रिवेणीनगर, म्हेत्रेवस्तीमधून संगिता प्रभाकर ताम्हाणे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. ताम्हाणे यांचे माहेर पुणे जिल्ह्यातील पाबळ येथील आहे. 
 

त्रिवेणीनगर, रुपीनगर परिसरात पती प्रभाकर ताम्हाणे हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करत समाजकार्य करत आहेत. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात ते काम करतात. 

बचत गट सुरु केले. त्याच्या माध्यमातून महिलांशी संपर्क वाढत गेला. तुळजाभवानी सेवा पतसंस्थेच्या माध्यमातून नागरिकांना मदत केली. तुळजाभवानीचे मंदीर बांधले आहे. मंदीरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. मंदीरात महिला मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे महिलांशी संपर्क वाढला. त्याचा निवडणुकीत फायदा झाल्याचे, संगीता ताम्हाणे यांनी सांगितले. 
 

लग्नानंतर शेती करत असताना समाजकार्याला सुरुवात केली. दीर रामभाऊ ताम्हाणे राजकारणात होते. ते ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आले होते. त्याच्यामुळे घरात राजकीय वातावरण होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन राजकारणात उतरले. प्रभागात वीज, पाणी, अंतर्गत रस्ते या मुलभूत सुविधांची वानवा आहे. या सर्व सुविधा आगामी काळात सोडविणार आहे. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी क्रिडांगण, महापालिकेचे प्रशस्त रुग्णालय सुरु करणार असल्याचे, ताम्हाणे यांनी सांगितले. 
 

महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणार आहे. प्रभागातील चौका-चौकात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवणार आहे. त्रिवेणीनगर परिसर रेडझोनच्या हद्दीत येत आहे. त्याच्यामुळे प्रभागात मोठी विकासकामे करण्यास अडचणी येत आहेत. रेडझोनचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, संगिता ताम्हाणे यांनी ‘एमपीसी’ न्यूजशी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.