कात्रज बोगद्याजवळ अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

एमपीसी न्यूज – पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ भरधाव मोटार रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. आज (रविवारी) पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. 
 

चौंडाप्पा बसवराज कुंभार (वय 26, रा. वडगाव, धायरी, मूळ अक्कलकोट, सोलापूर) आणि विजयकुमार अतनी (वय 25, रा. गुबर्गा कर्नाटक)  अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.  गंभीर जखमी झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. 
 

पाच जण स्वीफ्ट मोटारीतून पुणे-बंगळुरु महामार्गावरुन साता-याच्या दिशेने जात होते. कात्रज बोगद्यातून ते शिर्डीला जाणार होते. चौंडाप्पा हा मोटार चालवत होता. कात्रज येथील दरी पुलावरुन जात असताना भरधाव मोटारीवरील त्याचे नियंत्रण सुटले. मोटार जोरात रस्ता दुभाजकाला जाऊन धडकली. त्यामध्ये चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, तिघे गंभीर जखमी झाले असून दोघांवर ससून रुग्णालयात तर एकावर रुबी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे, भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले. 

ही धडक एवढ्या जोरात होती की मोटारीचे टप उलटून पडले आहे. समोरील चाक तुटले असल्याचेही, पोलिसांनी सांगितले. भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.