पुण्यात मोबाईल शॉपी फोडणारे आरोपी जेरबंद

एमपीसी न्यूज – मोबाईल शॉपी आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे शटर उचकटून चोरी करणा-या तिघांना हडपसर पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई मंत्री मार्केट हडपसर येथे करण्यात आली. 


दिपक शंकर धापटे (वय 52, रा. मुंढवा, पुणे), संजय अजित तिरके (वय 22, रा. हडसपर) आणि अजय रमेश भालेराव (वय 19, रा. खंडेवस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गजेंद्रसिंग डुगंरसिंग राजपुरोहित (वय 23, स्वारगेट) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली होती. 

राजपुरोहित यांची हडपसर येथे जय मातादी या नावाने मोबाईल शॉपी आणि इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. 20 फेब्रुवारीला मध्यरात्री अज्ञातांनी मोबाईल शॉपीचे शटर उचकटून मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकानातील एलईडी टीव्ही, मिक्सर असा 74 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. 

राजपुरोहित यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मंगळवारी (दि. 7) आरोपी मंत्री मार्केट येथे रस्त्यावर मोबाईल फोन विक्री करत असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मोबाईल फोनची पावती मागितली असता पावती नसल्याचे आरोपींनी सांगितले. कसून चौकशी केली असता 15 दिवसांपूर्वी हडपसर येथील जय मातादी मोबाईल शॉपीतून चोरी केले असल्याची आरोपींनी कबूली दिली, असे पोलिसांनी सांगितले. 

त्यांच्याकडून नामांकित कंपनीचे 22 मोबाईल फोन,  एक मिक्सर, होम थिएटर, टीव्ही अशा वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी संजय आणि अजय यांनी टपरीचा पत्रा उचकटून दुकानातील सामानाची चोरी केली होती. त्यांच्याकडून गोल्डफ्लेक, सिगारेट व गाय छाप तंबाखुचा पुडा जप्त करण्यात आला आहे.  हडपसर पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.