इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी हटविण्यात प्रशासन हतबल

(अविनाश दुधवडे)

एमपीसी न्यूज – इंद्रायणीसह सर्वच नद्यांना अनेक समस्यांचा विळखा पडला आहे. पात्रांमध्ये होणारी अतिक्रमणे, भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी! जलपर्णीच्या संकटाने सर्वच नद्यांमध्ये घुसखोरी केली आहे. विशेषत: हिवाळा संपता संपता जलपर्णी नद्यांचा ताबा घेते आणि मग पावसाळ्यापर्यंत तिचेच राज्य प्रत्येक वर्षी नदीपात्रात पहावयास मिळते.

सर्वदूर झालेल्या अतिक्रमणामुळे नद्यांचा जीव गुदमरतो आहे. नदीनाल्यांना पाणी नसताना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढते आहे. गाळ उपसामुळे पडलेले खड्डे, कचरा व नदीकाठी वाढते अतिक्रमण यामुळे नद्यांचा श्वास गुदमरत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. येथील इंद्रायणी नदीत पाणी प्रदूषणाबरोबरच जलपर्णीचीही समस्या प्रत्येक वर्षी गंभीर होत आहे. जलप्रदूषण आणि ही जलपर्णी यांचा घट्ट संबंध आहे, कारण ही वनस्पती या दूषित खाद्यावरच जगते.

जलपर्णी ही वनस्पती प्रदूषणाची उत्तम निदर्शक आहे. तिच्यामुळे प्रदूषण होत नाही, तर प्रदूषण असेल तिथे ती वाढते असे जाणकारांचे म्हणणे आहे. इंद्रायणीत जलपर्णी हटविण्यासाठी प्रशासनाकडून फारसे शास्त्रीय प्रयत्नही केले जात नाहीत. त्यामुळे ही समस्या बिकट होत असून, पुराच्या काळात जलपर्णी वाहून गेल्यावरच इंद्रायणी नदीला मुक्ती मिळते. त्यामुळे जलपर्णी वाहून जाण्यासाठी इंद्रायणी नदीकाठावरील नागरिक प्रत्येक वर्षी पाऊस आणि पुराच्या प्रतीक्षेत असतात.  इंद्रायणीच्या प्रदूषणाबरोबर जलपर्णीची समस्याही तितकीच गंभीर आहे.

जलपर्णी जागीच जाळल्याने या वनस्पतीतून निर्माण होणारा ऑक्‍सिजन बंद झाल्याने नदीतील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती. प्रत्येक वर्षी संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने व्यापते. पावसाळा संपल्यानंतर लगेचच ही समस्या निर्माण होते. जलपर्णीची समस्या गंभीर बनल्यानंतरच प्रशासन ते हटविण्यासंदर्भात नियोजन करते. मात्र काढल्यानंतर लगेचच फोफावणारी जलपर्णी पूर्ण हटविणे जिकिरीचे बनते. मागील अनेक वर्षांत जलपर्णी हटविण्यात प्रशासन हतबल ठरल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.