स्थायी समिती सदस्यपदी कोणाची लागणार वर्णी?

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समिती सदस्यपदी कोणाची वर्णी लागते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. स्थायी समितीत आपली वर्णी लागावी, यासाठी नगरसेवकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. 


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आज (मंगळवारी) पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत स्थायी समितीच्या सदस्यासह विविध विषय समितीच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. महापौर, उपमहापौर निवडीनंतर सभा तहकूब केली जाते. मंगळवारी सभा तहकूब केली जाते की सदस्यांची निवड केली जाते याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. 

स्थायी समिती ‘एम’ व्हिटामिन देणारी मानली जाते. त्यामुळे या समितीत आपली वर्णी लागावी यासाठी नगरसेवक इच्छुक असतात. स्थायी समितीत संधी नाही मिळाली तर इतर समितीच्या सभापती वर्णी लागावी यासाठी नगरसेवकांनी फिल्डिंग लावली आहे. नेत्यांनीही समितीच्या सभापती आपलाच समर्थक असावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

महापालिकेत स्थायी समितीसह, विधी समिती, जैवविविधता व्यवस्थापन समिती, महिला व बालकल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती अशा सहा समित्या आहेत. तर, यंदा शिक्षण मंडळ बरखास्त केले आहे. शिक्षण समिती स्थापन केली जाणार असून शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवकाचीच निवड केली जाणार आहे. 

स्थायी समितीमध्ये 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादीचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त होऊ शकतात. भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य  निवडले जाणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्थायी समिती सदस्यपदी कोणाला संधी देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.