पुणे नाशिक महामार्गावर स्कोडा-तवेराची धडक ; पाच जखमी

दुभाजकावरून उडून स्कोडा विरुद्ध दिशेला

चाकण मधील घटना

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात निघालेली स्कोडा मोटार (क्र. एम एच 15 डी एम 494) रस्ता दुभाजकावरून उडून विरुद्ध दिशेला जाणाऱ्या तवेरा मोटारीला (क्र. एम एच 43 आर 5254) धडकली. हा विचित्र अपघात सोमवारी (दि.13) रात्री पावणेनऊच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर चाकण (ता.खेड) हद्दीत हॉटेल संकल्प समोर घडला.

यामध्ये स्कोडा मोटारीचा चालक व तवेरा मधील चार ते पाच जण जखमी झाले असून सर्वांना येथील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील जखमींची नावे रात्री उशिरा पर्यंत समजू शकली नाहीत. संबंधित स्कोडा मोटार पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे भरधाव वेगात जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. व स्कोडा मोटार येथील संकल्प हॉटेलच्या समोरून रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकावरून उडून विरुद्ध दिशेने नाशिककडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या तवेरावर हॉटेल महाराजाच्या समोर आदळली. तवेरातील सर्व जण मुंबई येथून अवसरी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते, तो कार्यक्रम उरकून पुन्हा मुंबईला जात असताना हा अपघात झाला.

या अपघातात स्कोडा चालक गंभीर जखमी झाला असल्याचे चाकण पोलीस ठाण्याचे प्रमोद भोसले यांनी सांगितले. या विचित्र अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर या भागात वाहतूक कोंडी झाली होती. चाकण पोलिसांचे अपघात पथक, वाहतूक शाखेचे पोलीस, पोलीस मित्र यांनी रात्री उशिरा पर्यंत वाहतूक सुरुळीत करण्याचे प्रयत्न चालविले होते. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.