स्वतंत्र गटाच्या भुमिकेवर दत्ता साने ठाम

दत्ता सानेंसह राष्ट्रवादीचे चार नगरसेवक  महापौर निवडणुकीला अनुपस्थित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांच्यासह चार नगरसेवक अनुपस्थित राहील्याने साने यांच्या  स्वतंत्र गटाचे काय, या चर्चेला महापालिका वर्तुळात उधाण आले होते. महापालिका सभागृहात हे चार नगसेवक वगळता राष्ट्रवादीचे 32 नगरसेवकांनी हजेरी लावली होती.

बंटी आणि बबलीला पक्षातून हालवा, विरोधी पक्षनेतेपदी योगश बहल नको असे म्हणत दत्ता साने  यांच्या नेतृत्वाखाली 24 नगरसेवकांनी बंड पुकारले आहे. ज्या नेत्यांमुळे पक्षाचे वाटोळे झाले आहे. त्या नेत्याच्या हातात विरोधी पक्षनेते पद नको, असा पवित्रा साने यांनी घेतला आहे. याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना साने म्हणाले की, आम्ही आमची भूमिका मांडली आहे. त्यानुसार पक्षातील महत्वाच्या पदावरुन बंटी व बबलीला हलवा अन्यथा आम्ही पक्षाला रामराम करु, माझा वैयक्तीक राजीनामा तयार आहे. इतरांचीही हीच भूमीका आहे. मात्र दबावामुळे कोणी बोलत नाही. दोन दिवसात तेही बोलायला लागतील व चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

या विषयी अजित दादांशी अद्याप चर्चा झालेली नाही, मात्र त्यांनी चर्चेला बोलावले तर आम्ही नक्की जाऊ.  कारण ज्यांनी शहराचे  वाटोळे केले, पक्षाचे वाटोळे केले त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करायचे नाही. त्यामुऴे आम्ही आमचा स्वतंत्र गट बनवणार ही आमची भूमीका ठाम आहे, असेही त्यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना सांगितले.

याविषयी  योगेश बहल यांनी  आपली भूमीका मांडताना सांगितले की, जर काही मतभेद असतील तर ते समोरा-समोर बसवून सोडवू, कारण हे पद काही मी मागवून घेतले नाही, ते पक्षश्रेष्ठींनी मला दिले ते फक्त मी स्विकारले आहे. जनतेने आपल्याला विरोधात बसण्यास सांगितले आहे. त्यामुळे एकमेकात भांडत बसण्यापेक्षा विरोधी पक्ष म्हणून एकजूटीने काम करणे महत्वाचे ठरेल, असे मत बहल यांनी व्यक्त केले.

महापौर निवडणूकीत आज राष्ट्रवादीचे दत्ता साने, अजित गव्हाणे, विनोद नढे, रोहीत काटे हे चार नगरसेवक अनुपस्थित होते. यावर दत्ता साने  म्हणाले की, माझ्या गटातील एकही नगरसेवक तेथे नव्हता शाम लांडे यांच्या अर्जाला अनुमोदक व सुचक असणारे दोन नगरसेवक वगऴता कोणीच निवडणूकीला गेले नाही असे साने यांनी सांगितले.

मात्र आज सभागृहातून राष्ट्रवादीची उपस्थिती पाहता साने यांचा  स्वतंत्र गट बारगळणार की काय अशी चर्चा यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.