कानाच्या दुर्मिळ आजारावरील शस्त्रक्रिया यशस्वी

डॉ. विनया चितळे व पूना हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर मधील वैद्यकीय सहका-यांची कामगिरी

एमपीसी न्यूज – कानाच्या आतील भागात संसर्ग झाल्यानंतर तयार झालेल्या गाठीवर म्हणजे ग्लोमस टिम्पॅनिकम या दुर्मिळ आजारावर डॉ. विनया चितळे व पूना हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या टीमने आव्हानात्मक शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे. रक्तवाहिन्यांशी संबंधीत असलेल्या या गाठीवर चार तासात कानाच्या अवघ्या एक सेंटिमीटर पेक्षा कमी भागात ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

पूना हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर येथे मधूमेह झालेल्या महिला रुग्णावर (वय वर्षे 50) कान, नाक घसा तज्ञ डॉ. विनया चितळे, डॉ. निखिल गोखले, संकेत दाणी यांनी शस्त्रक्रिया पूर्ण केली. तज्ञ डॉ. संजय वैद्य यांनी आजाराचे निश्चित निदान करून शस्त्रक्रियेचे नियोजन केले. या आजाराच्या रुग्णांची संख्या अतिशय कमी आढळते.

ग्लोमस टिम्पॅनिकममध्ये कानाच्या पडद्यामागे रक्तवाहिन्यांनी बनलेली लाल रंगाची गाठ तयार होते. ही गाठ होत असताना या गाठीमुळे कानातील फक्त एका बाजूला ह्रदयाच्या ठोक्यांसारखा आवाज येणे, तोल जाणे, ऐकू न येणे अशी लक्षणे दिसू लागतात. कानाच्या एकाच बाजूला आवाज येत असताना महिला रुग्ण डॉ. चितळे यांच्याकडे आल्यानंतर ही लक्षणे ग्लोमस  टिम्पॅनिकम  या आजाराची असल्याचे लक्षात आले. सीटी स्कॅन, एमआरआय व काही आवश्यक चाचण्या केल्यानंतर रुग्ण महिलेला ग्लोमस  टिम्पॅनिकम हा आजार झाल्याचे निश्चित झाले. महिलेच्या उजव्या कानातील मध्यवर्ती भागात ही गाठ व्यापण्यास सुरूवात झाली होती व नाकाकडून मध्यकर्णाकडे जाणा-या भागात ही गाठ पसरत असल्याचे दिसून आले. कानाच्या कोणत्याही भागाला धक्का न लागू देता अवघ्या 1 सेंटीमीटर पेक्षा कमी भागातील ही शस्त्रक्रिया डॉ. चितळे व त्यांच्या सहका-यांनी चार तासात पूर्ण केली.     

ग्लोमस  टिम्पॅनिकम या आजाराविषयी सांगताना डॉ. चितळे म्हणाल्या, हा आजार झाल्यानंतर तयार होणारी गाठ ही कानाचा पूर्ण भाग व्यापण्यास सुरूवात करते. त्यामुळे कानातील इतर भागांना इजा होण्याचा धोका असतो. कानाच्या पडद्याला छिद्र होऊ शकते. शरीराचा तोल सांभाळणाºया प्रणालीला धक्का बसला तर सतत चक्कर येऊ शकते. मेंदूकडे जाणाºया शुध्द रक्तवाहिनीला धक्का लागल्यास अर्धांगवायू (पॅरालेसीस) होण्याची शक्यता असते. अशुध्द रक्तवाहिनीला धक्का लागल्यास रक्तस्त्राव व मृत्यूची संभावना असते. चेहºयातील मज्जातंतूला धक्का लागल्यास चेह-याची हालचाल बंद होते अन्यथा चेहरा वाकडा होऊ शकतो.

त्या पुढे म्हणाल्या, शस्त्रक्रिया करीत असताना मेंदूकडे जाणारी वाहिनी, कान आणि मेंदूमधील भिंत, चेह-याची हालचाल ज्यामुळे होते ते मज्जातंतू, शरीराचा तोल सांभाळणारी वाहिनी, कानाला रक्तपुरवठा करणारी शुध्द रक्तवाहिनी, खालच्या भागातील अशुध्द रक्तवाहिनी या कोणात्याही भागाला धक्का न लागू देता ही शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. योग्य निदान, शस्त्रक्रियेचे योग्य नियोजन व त्यामागील अभ्यास या गोष्टींमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. आपल्या कानाच्या एका बाजूला आवाज येत असल्यास थोडाही वेळ न गमावता कान, नाक, घसा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे ही त्यांनी सांगितले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.