मावळ पंचायत समिती सभापतीपदी गुलाबराव म्हाळस्कर बिनविरोध

उपसभापती पदी शांताराम कदम


एमपीसी न्यूज – मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी आज (मंगळवारी) भाजपचे गुलाबराव म्हाळस्कर यांची बिनविरोध निवड झाली. तर  उपमहापौरपदी भाजपचे  शांताराम कदम  यांची निवड झाली.

निवडणूक पिठासन अधिकारी सुभाष बागडे यांच्या उपस्थितीत सभापती आणि उपसभापती यांची निवडणूक  पार पडली.  यावेळी  गट विकास अधिकारी निलेश काळे यांनी काम पहिले. तसेच वडगाव गणातून निवडून आलेले गुलाबराव म्हाळस्कर, टाकवे बुद्रुक गणातून शांताराम कदम, चांदखेड गणातून निकिता घोटकुले, इंदोरी गणातून ज्योती शिंदे, खडकाळा गणातून सुवर्णा कुंभार तर महागाव गणातून जिजाबाई पोटफोडे हे भाजपचे सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वडेश्वर गणातून निवडून आलेले दत्तात्रय शेवाळे, सोमाटणे गणातील साहेबराव कारके, वाकसाई गणातील महादू उघडे व कुसगाव गणातील राजेश्री राऊत उपस्थित होते .


मावळ पंचायत समितीचे  गुलाबराव म्हाळस्कर  21  वे सभापती ठरले आहेत. सभापती पद हे नागरिकाचा  मागास प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे ह्या पदासाठी भाजपा कडून गुलाबराव म्हाळस्कर यांचा  एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे ही निवड बिनविरोध पार पडली. मात्र उपसभापती पदासाठी भाजपाकडून शांताराम कदम तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजश्री संतोष राऊत यांनी अर्ज दाखल केल्यामुळे उपसभापती पदासाठी पंचायत समिती सदस्यांची हात उंचावून निवडणूक घेण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीच्या राजश्री राऊत यांना 4 तर शांताराम कदम यांना 6 मते पडल्यामुळे शांताराम कदम यांची उपसभापतीपदी निवड निवडणूक पिठासन अधिकारी सुभाष बागडे यांनी जाहीर केली.


निवडीनंतर नवनिर्वाचीत सभापती गुलाबराव म्हाळस्कर म्हणाले,  हे सभापती पद माझे नसून संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्त्यांचे आहे. रस्ते, विकास, पाणी आणि शिक्षण या मुलभूत गरजा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्याचा विकास हेच आमचे मुख्य उद्धिष्ट असून सर्व सदस्यांना एकत्रित घेऊन तालुक्याच्या विकास कामांवर भर देणार आहे.

मावळ पंचायत समितीवर गेल्या 25 वर्षापासून भाजपची सत्ता आहे. या विजयानंतर आमदार बाळा भेगडे, जेष्ठ नेते केशवराव वाडेकर, तळेगावच्या नगराध्यक्ष चित्रा जगनाडे, अरुणा पिंजण, सुनील शेळके, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, भास्करराव म्हाळस्कर, गणेश भेगडे,  माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, मंगल वाळूजकर, माऊली शिंदे, जितेंद्र बोत्रे, बाळासाहेब घोट्कुले, अनंता कुडे, संभाजी म्हाळस्कर, नितीन कुडे आदीसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित  सभापती गुलाबराव म्हाळस्कर व उपसभापती शांताराम कदम यांची वडगाव मधून मिरवणूक काढण्यात आली तसेच आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.