शुक्रवार, डिसेंबर 2, 2022

शहराचा विकास म्हणून राष्ट्रवादीची विकासकामे सुरु रहावीत – प्रशांत जगताप

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीने सुरु केलेल्या प्रकल्पांकडे भाजपने वेगळ्या पद्धतीने न पाहता शहराचा विकास म्हणून पहावेत आणि ते प्रकल्प पुढे सुरु रहावेत, अशी अपेक्षा पुण्याचे मावळते महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. तसेच पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता गेल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. 

प्रशांत जगताप यांचा महापौर पदाचा कार्यकाळ मंगळवारी (दि.14) संपला आहे. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत जगताप बोलत होते. पुणे महापालिकेत सत्तांतर झाले असून भाजपची सत्ता आली आहे. महापौरपदी भाजपच्या मुक्ता टिळक यांची आज (बुधवारी) निवड झाली. 

सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने विविध विकासकामे केली आहेत. तसेच विविध कामे हाती घेतली होती. निवडणुकीत सत्तांतर झाले. भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची कामे आहेत, असे समजून त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहू नये. शहराचे प्रकल्प आहेत, असे समजून पुढे सुरु ठेवावीत, अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली. पक्षांच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जाऊ नये, असेही ते म्हणाले. 
 
महापौर असताना कधीच पक्षभेद केला नाही. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचीही कामे केली आहेत असे सांगत जगताप म्हणाले, पुण्याचा महापौर होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. महापौरपदाचा काळ हा माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षण आहे. पहिल्यांदाच निवडून आलो असताना पक्षाने महापौरपदाची संधी दिली. महापालिकेतील पक्षांची सत्ता गेल्याची खंत आहे, असेही जगताप म्हणाले. 
 

महिला महापौर होत आहेत, याचा आनंद आहे. महापौर मुक्ता टिळक या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. त्यांना महापौर पद मिळाल्याचा मनस्वी आनंद होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील त्यांनी दिल्या.

Latest news
Related news