समाज विकासाकरीता झटणा-यांचा आदर्श घ्यायला हवा – वर्षा उसगांवकर

सोलापूर भूषण व पुणे रत्न पुरस्कार वितरण सोहळा


एमपीसी न्यूज – कोणतेही कार्यक्षेत्र गहन असते. चित्रपटामध्ये काम करताना आम्हाला रसिकांकडून प्रेरणा मिळते. परंतु सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांना स्वत:च्या कार्यातूनच प्रेरणा मिळते. त्यामुळे ते आपापल्या क्षेत्रात मोठे काम करु शकतात. आपण हात-पाय असूनही अनेक कारणे देत कामे टाळतो. परंतु अपंग असूनही अनेकजण आज समाजसाठी काम करीत आहेत. त्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, संरक्षण, पर्यावरण क्षेत्रात काम करीत समाज विकासाकरीता झटणा-यांचा आदर्श प्रत्येकाने घ्यायला हवा, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केले.

सोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद््देशीय फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मावतीजवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटयगृहात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शहाजीराव पाटील, सुशिला निंबाळकर, मेघराज राजे भोसले, प्रा.डॉ.सुधाकर जाधवर, किरण गोटे, शार्दुल जाधवर, भाऊसाहेब निंबाळकर, शैलेंद्र पाटील, सुरेखा जाधवर, सचिन पाटील, शोभा पाटील, केशरनानी घाडगे आदी मान्यवर  उपस्थित होते.

संस्थेच्या तिस-या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकुमार सिद्धप्पा पाटील यांना सोलापूर कार्य वैभव भूषण पुरस्कार, राजाभाऊ चौरे यांना सोलापूर शौर्य भूषण पुरस्कार, चंद्रकांत देशमुख यांना सोलापूर कृषी भूषण पुरस्कार, डॉ.सुवर्णा नाईक-निंबाळकर यांना सोलापूर समाजभूषण पुरस्कार आणि क्रिकेटपटू केदार जाधव याला सोलापूर भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरुप होते.


    
वर्षा उसगांवकर म्हणाल्या, चांगल्या कार्याची सुरुवात आपल्या घरातून होते, ही म्हण सार्थ करीत संस्थेने वाटचाल केली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांचा सन्मान होणे अत्यंत महत्त्वाचे असून अशा कार्यक्रमांतून जे संस्कार घडतात, ते मोलाचे आहेत.

पुरस्काराला उत्तर देताना राजकुमार पाटील म्हणाले, मी सर्वसामान्य कुटुंबातील असून एका अपघातामुळे माझ्या आयुष्याची दिशा बदलली. तरीही त्यामुळे खचून न जाता, पुन्हा उभे रहात मी शिक्षणक्षेत्रात काम करु शकलो. छोटया गोष्टींसाठी आत्महत्या करण्याचा विचार करणा-यांनी आपल्याला मिळालेले आयुष्य किती सुंदर आहे, याचा एकदातरी विचार करीत काम करावे.

पुणे रत्न पुरस्काराने विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान

पुण्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-यांना पुणे रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये उद्योग व्यवसाय क्षेत्रात सचिन घाडगे व धीरज मांझी, गृह सुशोभिकरण क्षेत्रात अभिजीत कुलकर्णी व निलेश निगडे, बांधकाम क्षेत्रात अ‍ॅड.गफूर अहमद पठाण, कला क्षेत्रात स्वाती महाडिक, वैद्यकीय क्षेत्रात डॉ.राजेश पवार, लोककला क्षेत्रात पद्मजा कुलकर्णी, पर्यावरण क्षेत्रात गोविंदराव पवार, सामाजिक क्षेत्रात चंद्रजीत कावडे, औषधनिर्मीती क्षेत्रात अनिल घनवट, सिनेनाटय क्षेत्रात माधव अभ्यंकर, नेहा सोनावणे, मेघराज राजे भोसले पोलीस क्षेत्रात विठ्ठलराव जाधव आणि पत्रकारिता क्षेत्रात मंगेश कोळपकर यांना सन्मानित करण्यात आले.

संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त महाराष्ट्राची परंपरा उलगडणा-या लावण्यसंध्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  शहाजीराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.सुधाकर जाधवर यांनी स्वागत केले. संतोष चोरडिया आणि कविता घिया यांनी सूत्रसंचालन केले. शार्दुल जाधवर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.