शनिवार, डिसेंबर 3, 2022

निगडी प्रभाग ”स्मार्ट” करणार – नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे

एमपीसी न्यूज – गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठेने काम करत आलो. निगडी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले. कामाची दखल घेऊन भाजपने उमेदवारी दिली आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडून आलो. आगामी पाच वर्षात निगडी  प्रभाग ‘स्मार्ट’ करणार असल्याचे, नवनिर्वाचित नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी  ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले. 


प्रभाग क्रमांक 13 निगडी गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर प्रभागातून प्रा. उत्तम केंदळे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. 

केंदळे यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे चुलते चाकण पंचायत समितीचे सदस्य होते.  त्यांना घरातूनच समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू मिळाले. केंदळे संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी 2003 पासून भाजपचे काम करण्यास सुरवात केली. निगडी-चिखली मंडळाचे सध्या ते अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वी युवा मोर्चाचे शहरउपाध्यक्ष, सरचिटणीस पदावर काम केले आहे. 

केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘स्मार्ट सिटी’ योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला आहे. महापालिका पहिल्या टप्प्यांत तीन प्रभाग स्मार्ट करणार आहे. त्यामध्ये निगडी प्रभागाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पाच वर्षात निगडी प्रभागाचा कायापालट करुन ‘स्मार्ट’ करणार असल्याचे, नगरसेवक प्रा. केंदळे यांनी सांगितले.

अंतर्गत रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सोयी-सुविधा प्रभागातील नागरिकांना कमी पडून देणार नाही. प्रभागातील नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरु करणार आहे. किरकोळ कामांसाठी नागरिकांना नगरसेवकाकडे येण्याची गरज भासू देणार नाही, असेही ते म्हणाले.

प्रभागात सुसज्ज रुग्णालय करणार आहे. प्रभागात महापालिकेच्या दोन शाळा आहेत. त्याची दुरावस्था झाली आहे. मुलांचा पाया भक्कम करण्यावर भर देणार असून ई-लर्निंग सुरु करणार आहे. शाळा हायटेक करण्यावर भर देणार आहे. 

प्रभागात मोफत वाय-फायची सुविधा पुरविणार आहे. सुरक्षिततेसाठी संपूर्ण प्रभागात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवणार असल्याचे, नगरसेवक केंदळे यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितले. भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा आपल्या विजयात सिंहाचा वाटा असल्याचेही, केंदळे यांनी सांगितले.

Latest news
Related news