शिवपालखी मिरवणुकीने शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात साजरी

श्री शिवनेरी स्मारक समितीतर्फे आयोजन ; पाळणा म्हणून सवाद्य छबिना मिरवणूक

एमपीसी न्यूज – जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष… रणवाद्यांचा दुमदुमणारा आवाज… रांगोळी व फुलांच्या पायघडया… पंचक्रोशीतील महिलांनी म्हटलेल्या पाळण्याने झालेले शिवमय वातावरण…आणि चांदीच्या शिवपालखीतून सवाद्य निघालेली छबिना मिरवणूक अशा वातावरणात शिवनेरीवर फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला शिवजयंती उत्सव मोठया दिमाखात साजरा झाला.

श्री शिवनेरी स्मारक समितीतर्फे किल्ले शिवनेरी येथे शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी श्री शिवाई देवीची पूजा केली. यावेळी समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात रमेश खत्री, रमेश करपे, गणेश कोरे यांनी सहभाग घेतला.

शिवजन्मस्थळावर पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील महिला पाळणा म्हणून शिवजन्म साजरा झाला. त्यानंतर ध्वजारोहण होऊन शिवकुंजावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे शाहीर गणेशदादा टोकेकर व सहका-यांनी पोवाडा सादर केला. मिरवणुकीत जुन्नरमधील बालवारकरी सहभागी झाली होते. यावेळी एकनाथ वाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या पूनम मनसूख यांना यावर्षीचा राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, करमुक्त व्यवस्था करणारे पहिले राजे म्हणून शिवछत्रपतींची ओळख आहे. श्रीरामाचे चारित्र्य आणि श्रीकृष्णाची राजनिती यामार्गाने राज्य करता येईल, अशी शिकवण राजमाता जिजाऊंनी त्यांना दिली होती. स्वराज्यात महाराजांनी सर्वांच्या हाताला काम दिले. व्यक्तीसाठी नसून राष्ट्रासाठी लढण्याची शिकवण राजांनी दिली. हजारो योद्धे निर्माण करीत संघर्षासाठी लढणारा समाज निर्माण केला, असेही त्यांनी सांगितले.

 
शासनाने तिथीनुसार शिवजयंती साजरी केली नाही तर आंदोलन करु – हेमंतराजे मावळे


कै.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि कै.शाहीर किसनराव हिंगे यांनी 1980 सालापासून शिवनेरी गडावर हा उत्सव सुरु केला होता. तीच परंपरा पुढे चालू ठेवत ही मिरवणूक काढण्यात आली. आजच्या पिढीवर सुराज्याचे संस्कार व्हायला हवे, यासाठी सर्वत्र शिवजयंती साजरी व्हायला हवी. शिवजयंती शासनाने तिथीनुसार साजरी करायला हवी. शासनाने पुढील वर्षी तिथीने शिवजयंती साजरी केली नाही तर आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

"shiv"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.