पुण्यात पुन्हा जळीतकांड; खडकवासलाच्या माजी उपसरपंचाचे चार ट्रक जाळले

एमपीसी न्यूज – खडकवासला गावचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटीलबुवा मते यांचे चार ट्रक काल (दि.15) मध्यरात्री अज्ञात व्यक्तींकडून जाळण्यात आले. पुण्यात दुचाकीनंतर आता चारचाकी व मोठी वाहनेही जाळण्याचे प्रकार होऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

यासंबंधी सिंहगड रस्त्यावरील अग्निशामकदलास माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु चार ट्रकमधील डिझेलमुळे आगीचे लोट मोठे होते. ट्रक रोज दुसऱ्या जागेवर उभे करीत होते. परंतु शिवजयंतीचा दोन दिवस कार्यक्रम असल्याने नेहमीच्या जागेऐवजी बंगल्याच्या शेजारी 40-50 फुटांवर ते उभे केले होते. रात्री अडीच ते पाऊणेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार ते पाचजण आले. त्यांनी ते ट्रक जाळले, असे मते यांनी सांगितले. 


ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. संबंधीत घटनेचा हवेली पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज पाहून गुन्हा दाखल केला जाणार आहे. मते यांचे ट्रक जाळण्यामागे नक्की कारण काय याबाबत चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

मते यांची सिमेंट विक्रीची एजन्सी आहे. सिमेंट ने-आण करण्यासाठी ट्रकचा वापर केला जातो. हे ट्रक 12 व 14 चाकी होते. एक ट्रकमध्ये सिमेंटची पोती भरलेली होती. त्याच्यावरील ताडपत्री जळाली. आगीत जीवित हानी झालेली नसली तरी चारही ट्रक पूर्ण जाळून खाक झाल्याने सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे मते यांनी सांगितले. आग लागली त्यावेळी मते यांच्या घरातील सर्वजण झोपले होते. आग लागल्यानंतर आवाजामुळे ते जागे झाले. त्यांनी मग आग्निशमन व पोलिसांना माहिती दिली.

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.