शिवरायांच्या रुपातील योद्धयांमुळे कोणताही दहशतवाद भारताला संपवू शकणार नाही

साध्वी सरस्वतीदेवी (मध्यप्रदेश) यांचे प्रतिपादन : हुतात्मा लान्सनायक शहिद सौरभ फराटे यांना पुरस्कार प्रदान


एमपीसी न्यूज – महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाकरीता सौरभ फराटे यांसारख्या वीरपुत्रांची आज गरज आहे. त्यामुळे जेव्हा या देशाला गरज असेल तेव्हा प्रत्येकाने समर्पित होण्याची तयारी ठेवा. आपल्या देशाच्या संस्कृतीच्या रक्षणाकरीता प्रत्येक आईला जिजाऊचा अवतार घ्यावा लागेल. भक्तीची स्थापना करण्यासाठी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर विठ्ठलाच्या रंगात न्हाऊन निघाले होते. तर धर्माचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषांनी जन्म घेतला. जोपर्यंत शिवरांयांच्या रुपातील योद्धे या भूमीवर जन्म घेतील, तोपर्यंत कोणताही दहशतवाद भारताला संपवू शकत नाही, असे प्रतिपादन साध्वी सरस्वतीदेवी (मध्यप्रदेश) यांनी केले.

शिवजयंतीनिमित्त गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळतर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात होते. यावेळी हुतात्मा लान्सनायक शहिद सौरभ फराटे यांना प्रभात पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होते. फराटे यांचे वडिल नंदकुमार फराटे आणि आई मंगल फराटे यांनी पुरस्कार स्विकारला.  यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रविंद्र्र वंजारवाडकर, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सव प्रमुख सचिन भोसले, कुणाल जगताप, गोविंद मोरे, मंगेश शिंदे, रविंद्र भन्साळी, संदिप नाकील अमोल थोरात, केतन भागवत, उदय वाडेकर, चंद्रकांत ढगे, अमोल थोरात, नितीन अरगडे, राजेश नाईक, अजय गंधे आदी उपस्थित होते.  मानचिन्ह, रोख रक्कम अकरा हजार रुपये, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा उत्सवाचे 31 वे वर्ष आहे. यावेळी शिवसूर्य या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

साध्वी सरस्वतीदेवी म्हणाल्या, देशातील माता भगिनींसोबत बलात्कार, लव्ह जिहाद, हुंडाबळी असे गैरप्रकार  होताना दिसतात. अशावेळी प्रत्येक भावाने त्यांना त्यांच्या सामर्थ्यांची जाणीव करुन द्यायला हवी आणि तीच्या अस्तित्वासाठी लढण्याची शक्ती तीला द्यायला हवी. आमच्या अस्मितेकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर आम्हाला श्रीरामांचे धनुष्य उचलावे लागेल आणि दहशतवाद संपवावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

रविंद्र वंजारवाडकर म्हणाले, देशासाठी आपले मातृत्व समर्पित करण्याची भारताची परंपरा आहे. मातृत्व अर्पण करण्याची मातृशक्ती केवळ भारताकडेच आहे. आपल्या देशावर, हिंदू समाजावर हजारो वर्षे आक्रमणे झाली. त्यावेळी शिवाजी महाराजांनी ओळखले की हे आक्रमण धर्मावर, भाषेवर आणि आपल्या संस्कृतीवरील आहे. शिवरायांनी हे आक्रमण दूर करण्याकरीता स्वदेश, स्वधर्म आणि स्वनिष्ठा जागविली. त्यामुळे देशासाठी आणि हिंदूत्वासाठी ते प्रेरणास्थान आहेत.

यंदा मिरवणुकीमध्ये शहिद सौरभ फराटे यांना मानवंदना देण्यासाठी रथ तयार करण्यात आला होता.  तसेच महाराष्ट्र शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेला चाकणचा संग्राम दुर्ग हा जीवंत देखावा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते.  याशिवाय शिवप्रतिमा असलेला आकर्षक रथ, शिववर्धन ढोल-ताशा पथक, अकलूजचे ओम श्री हलगी ग्रुप हे पारंपरिक हलगी पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

कसबा पेठेतील त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठान मर्दानी आखाडातर्फे लाठी-काठी, दांडपट्टा, तलवार हे मर्दानी खेळ सादर करण्यात आले.  कृष्णहट्टी चौक-गंजपेठ पोलीस चौकी-कस्तुरे चौक-फुलवाला चौक-जैन मंदिर-पंचमुखी मारुती मंदिर-पानघंटी चौक-शितळा देवी चौक मार्गे गुरूवार पेठेतील राम मंदिराजवळ मिरवणुकीचा समारोप झाला.

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.