गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

कॉम्प्युटर इंजिनिअर मीनल यादव आता पालिका सभागृहात!

एमपीसी न्यूज – मीनल यादव या आकुर्डी काळभोरनगर प्रभाग 14 च्या विजयी उमेदवार आहेत. त्यांना पहिल्याच प्रयत्नात पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक बनण्याची संधी मिळाली. याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना यादव म्हणाल्या की, या पदामुळे कष्टाचे चिज झाले व स्वतःच्या पायावर उभारल्याचे समाधान मिळाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मीनल यादव यांचे माहेर पुण्यातील खेड-शिवापूर आहे. माहेरीही राजकारणाचा वारसा होता, तर वडील बांधकाम क्षेत्रात आहेत. यादव यांनी पुण्याच्या भारती विद्यापीठ येथून  कॉम्प्युटर इंजिनिअरींगची पदवी मिळवली आहे. शिक्षण पूर्ण होताच दुस-याच वर्षी त्यांचा विशाल यादव यांच्याशी विवाह झाला. विशाल यादव हे गेल्या 10 वर्षापासून शिवेसेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांना यावेळी निवडणूक लढविण्याची इच्छा होती, मात्र प्रभागातील नगरसेवकपदाचे आरक्षण महिलेला पडल्यामुळे विशाल यादव यांनी मीनल यांना उभे केले.

याविषयी बोलताना मीनल यादव म्हणाल्या की,  पतीच्या मोठ्या जनसंपर्कामुळे माझा नवीन चेहरा असला तरी मी निवडून येऊ शकले. यापूर्वी मी महिलांचे बचतगट, त्यांचे विविध प्रशिक्षण वर्ग घेत होते, माहेरी व सासरी दोन्हीकडे एकत्र कुटुंब असल्यामुळे मला नेहमीच कुटुंबाची साथ मिळाली. आजही माझी दोन छोटी मुले आहेत, मात्र घरच्यांच्या पाठिंब्यामुळे  मी आज नगरसेविका बनू शकले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

अभियंता असूनही कधी नोकरी करावीशी वाटली नाही का, असे विचाले असता मीनल यादव म्हणाल्या की, मूळात माहेरी व सासरी दोन्हीकडे स्वतःचे उद्योग असल्यामुळे मी नोकरीचा विचार केला नाही. घरी वडिलांना व सासरी पतीला उद्योगात साथ दिली. माझ्याप्रमाणेच माझ्या प्रभागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे रहावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

व्यवसायामुळे आमच्या मोठ-मोठ्या कंपनीत ओळखी आहेत. त्याचा फायदा घेत कंपनीतील कामगारांना खानावळीतून जेवण पुरवणे, त्यांचे कपडे धुवून देणे आदी कामांद्वारे गरजू महिलांना रोजगार देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

 महापालिका सभागृहातील पहिल्या अनुभवाबद्दल बोलताना मीनल म्हणाल्या की, तो अनुभव खूप छान होता, बाहेरुन जे लोक कायम भांडत असतात असे वाटते, तो लोक मूळात एकत्र आले की हेवे-दावे, पक्ष विसरुन एकत्र येतात सभागृहाबाहेर त्यांचे कोणतेच वादविवाद नसतात, ते एकमेकांना आपलुकीने मदत कतात. मलाही पहिल्या दिवशी खूप जणांनी मदत केली. त्यामुळे हा अनुभव छान होता.

"dipex"

Latest news
Related news