शिव छत्रपती व्यवस्थापनशास्त्रातील सर्वोच्च गुरू – राजेंद्र घावटे

एमपीसी न्यूज –  आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात व्यवस्थापनशास्त्राचे सर्वोच्च गुरू म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आपल्याला पाहता येईल असे प्रतिपादन व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले. फाल्गुन कृष्ण तृतीया या तिथीनुसार हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 387 व्या जयंतीचे औचित्य साधून तळेगाव परिसरातील एकोणीस मंडळांनी एकत्र येऊन ‘शिवजयंती महोत्सव – 2017’ चे आयोजन केले होते. या सोहळ्याच्या समारोपात ‘युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावरील व्याख्यानात घावटे बोलत होते.

याप्रसंगी तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेविका सुलोचना आवारे, नगरसेविका अनिता पवार, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेवक संतोष शिंदे, सुशील सैंदाणे, गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, उद्योजक किशोर आवारे, माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे, माजी शिक्षण मंडळ उपसभापती संदीप जगनाडे, माजी नगरसेविका निर्मलाताई लांडगे तसेच समाविष्ट सर्व एकोणीस मंडळांचे युवाध्यक्ष उपस्थित होते.

राजेंद्र घावटे म्हणाले की, चित्रपटांच्या थिल्लर गाण्यांवर नाचणारी बेभान तरुणाई एका बाजूला आणि शिवछत्रपतींच्या इतिहासापासून प्रेरणा घेणारी सजग युवाशक्ती एका बाजूला असे समाजात चित्र आहे. साडे तीनशे वर्षांचा शिवइतिहास युवकांना आकृष्ट करतो, ही अद्भुत गोष्ट आहे. आदर्श राज्यकारभार कसा असावा याचा वस्तुपाठ म्हणून शिवचरित्राकडे पाहता येईल. अठरा पगड जातींच्या युवकांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य स्थापन करणारा युवराज, महिलांचा योग्य आदर आणि सन्मान करणारा नीतिपुरुष, भ्रष्टाचाऱ्यांना कठोर शासन करणारा कर्तव्यकठोर शासक, गनिमी काव्याचा वापर करणारा चतुर सेनानी, अद्वितीय योद्धा, जमिनीचा सात-बारा प्रथम नोंदवणारा आणि शून्य व्याजदराने कर्ज देणारा शेतकऱ्यांचा तारणहार, वतनदारी ऐवजी वेतनदारी निर्माण करणारा जगातील पहिला प्रशासक, स्वदेशीचा कट्टर पुरस्कर्ता आणि अंधश्रद्धा न मानणारा द्रष्टा नेता असे अनेक पैलू छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात होते. या सद्गुणांमुळे जागतिक स्तरावरील नेत्यांशी महाराजांची तुलना केली जाते; आणि त्यातून त्यांचे सर्वोच्च स्थान अधोरेखित होते. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर, प्रबोधनकार ठाकरे अशा अनेक विभूतींना शिवचरित्रातून प्रेरणा मिळाली!" शिवचरित्रातील अनेक प्रसंगांचा संदर्भ देत राजेंद्र घावटे यांनी महाराज सर्वार्थाने युगप्रवर्तक कसे होते याचे विवेचन केले.

मुख्य संयोजक महेंद्र पळसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून, सर्व सामाजिक मंडळांनी एकत्र येऊन सामाजिक सण – समारंभ साजरे करावेत ही लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेली संकल्पना शिवजयंती महोत्सव – 2017च्या निमित्ताने प्रत्यक्षात साकार झाली, याचा विशेष आनंद वाटतो. यामुळे राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक एकोप्यासाठी तरुणाई एकत्र येते, हा चांगला संदेश जनमानसात गेला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शिवजयंती महोत्सव – 2017 निमित्ताने सकाळी नऊ वाजता लोहगडावरून आलेल्या शिवज्योतीचे तळेगाव स्टेशन चौकात हॉटेल कुलदीपशेजारी स्वागत करून शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. दुपारी चार वाजता पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या हजारो तरुण-तरुणींनी ढोलताशा वाजवत आणि लेजीम खेळत स्वराजनगरीपासून तळेगाव स्टेशनपर्यंत काढलेल्या जंगी मिरवणुकीत सहभाग घेतला. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी ओवाळून स्वागत करण्यात आले. मर्दानी-साहसी खेळांच्या  प्रात्यक्षिकांनी नागरिक मंत्रमुग्ध झाले. यावेळी बालशिवाजी आणि शिवपालखी ही विशेष कौतुकाची बाब ठरली.

अनिल धर्माधिकारी आणि ओंकार वर्तले यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश चांदेकर यांनी आभार मानले. शिवाजी महाराजांच्या सामूहिक आरतीने सोहळ्याची सांगता झाली.
"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.