संगीत नाटयभूमीला पुन्हा उर्जितावस्थेत आणणार – विनोद तावडे

संगीत रंगभूमी पुरस्कार व पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण
एमपीसी न्यूज – संगीत नाटक उर्जितावस्थेत आणण्यासाठी काळानुरुप बदल करण्याची गरज आहे. रसिकांनी आता वेगऴ्या प्रकारची संगीत नाटके स्वीकारण्याची आवश्यकता आहे. संगीत नाटयभूमीला पुर्वीसारखे गौरव प्राप्त करुन देण्यासाठी जे बदल करावे लागतील त्यासाठी राज्य सरकार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे व त्यांना सर्वतोपरी मदत करील, तसेच संगीत रंगभूमी आणि नाटय रंगभूमीला जे सहकार्य हवे हे आहे ते शासन देण्यासाठी कटीबध्द असल्याचे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिले.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 2016-17 चा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार व नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. तावडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. एसएनडीटी महिला विद्यापीठातील पाटकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार चंद्रकांत ऊर्फ चंदू डेगवेकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी रामदास कामत यांच्या हस्ते तर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार लीलाधर काबंळी यांना ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कलाकार विजू खोटे उपस्थित होते.
राज्य सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दरवर्षी अनेक पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार देताना त्या-त्या कलाकाराचे योगदान ध्यानात घेण्यात येतात, कलाकाराच्या गुणवत्तेचा आणि कलेचा निकष लक्षात घेऊनच पुरस्कारार्थींची निवड करण्यात येते. पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात आलेली निवड समितीतील मधील ज्येष्ठ, तज्ज्ञ समिक्षकांमार्फतच पुरस्कारासाठी निवड करण्यात येते असे स्पष्ट करतानाच श्री. तावडे म्हणाले की, पण प्रसिध्दीची झोतात असलेल्या कलाकारानांच पुरस्कार देण्यात येते असे बोलले जाते. पण कलाकाराच्या कलेला कुठलेही कुंपण नाही. केवळ कलेचा विचार करुनच पुरस्कार देण्यात येतात.
गेल्या 35 वर्षाच्या काळात आपण जी मराठी रंगभूमीची सेवा केली त्या कलेचे चीज झाल्याची भावना पुरस्कारार्थी लिलाधर कांबळी यांनी व्यक्त केली. तर अनेक जुन्या नव्या दिग्दर्शकांकडून माझ्यावर संस्कार झाले, म्हणूनच आपण आपला प्रवास इथपर्यंत करु शकलो असे मनोगतही रंगकर्मी चंद्रकांत डेगवेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही पुरस्कार्थींच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा ‘वंदन…रंगवैभवा’ सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.