खेड तालुक्याचे राजकारण भगव्या वळणावर

(अविनाश दुधवडे)

एमपीसी न्यूज – जिल्हा बँक व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यशाने हुलकावणी दिली असली तरी सेनेच्या ताब्यात असलेले चाकण नगरपरिषद, राजगुरुनगर नगरपरिषदेत सत्तेतील महत्वाचा वाटा अशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील एक-एक सत्तास्थाने ताब्यात घेत सुरू असलेली शिवसेनेची यशाची घोडदौड आता पंचायत समितीपर्यंत येऊन ठेपली आहे.

खेड पंचायत समितीवर प्रथमच भगवा फडकविण्यात आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला यश आले आहे. काँग्रेसच्या एका सदस्याच्या सहकाऱ्याने खेड पंचायत समिती सेनेच्या ताब्यात आली असून आमदार गोरे यांच्या रणनीतीचे हे यश असल्याचे मानले जात आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा यावेळी सेनेकडून सफाया झाला आहे.

पुढील विधानसभा निवडणुकीत पुन्हा तालुक्यावर भगवा फडकविण्याच्या दृष्टीने तालुका संपूर्णपणे शिवसेनामय करण्यासाठी ही सर्वसमावेशक आणि नियोजनबद्ध पावले टाकण्यात येत आहेत. मात्र या निवडणुकीत भाजपनेही अपेक्षित असलेल्या दोन जिल्हा परिषद गटांसह अनपेक्षितपणे दोन पंचायत समितीचे गणही ताब्यात घेत सर्वांना चकीत केले आहे . राष्ट्रवादीच्या किल्ल्यांना खिंडार पाडून ग्रामीण भागात फुललेले कमळ भाजपसाठी अधिक महत्वपूर्ण मानले जात आहे. भाजपच्या या विजयाचे श्रेय केवळ त्या-त्या जिल्हा परिषद सदस्यांना आणि त्यांनी आखलेल्या योजनांना जाते.

बारामतीनंतर खेड तालुक्याची सुरुवातीपासून शरद पवार यांच्या विचारांना मानणारा तालुका अशी ओळख होती. सलग वीस वर्षे स्व. नारायण पवार यांनी आणि नंतर दहा वर्षे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे तालुक्यातील राजकारणावर मजबूत पकड ठेवली होती. काही अपवाद सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात खेड पंचायत समिती होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून सुरेश गोरे मोठ्या फरकाने निवडून आल्यानंतर खेड तालुक्यामध्ये शिवसेनेचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र बाजार समिती, जिल्हा बँक दिलीप मोहितेंनी आपल्याच ताब्यात ठेवली होती. आ. सुरेश गोरे यांनी सुरुवातीलाच चाकण-नाणेकरवाडी जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करून आपल्या बालेकिल्ल्यात विजयश्री खेचून आणला होता.

घरची चाकण नगरपरिषदही ताब्यात आली मात्र आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये सेनेचा प्रभाव दिसून आला नव्हता. जिल्हा बँक आणि बाजार समितीच्या निवडणुकीतही सेनेला अपेक्षित सूर गवसला नव्हता. या साऱ्याचे शल्य बोचत असलेल्या आ. गोरे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून प्रत्येक ठिकाणी उमेदवारी देताना अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळेच शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासात तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांपैकी प्रथमच सेनेचे तीन जिल्हापरिषद सदस्य व 14 पंचायत समिती गणांपैकी 7 गणांत सेनेचे पंचायत समिती सदस्य निवडून आले.

यंदाच्या निवडणुकीत काही ठिकाणी सेनेचे उमेदवार आणि राष्ट्रवादीत घमासान होऊन खूप कमी फरकाने सेनेचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार पराभूत झाले. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत तालुक्यात सर्वाधिक मते मिळविण्यातही सेनेला यश आले. पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करतानाही अत्यंत चलाखीने सेनेने भाजपऐवजी एकमेव सदस्य असलेल्या काँग्रेसशी सलगी केली. सेनेच्या सुभद्रा शिंदे यांना सभापती करताना महाळुंगे गणातून निवडून आलेले काँग्रेसचे अमोल पवार यांना उपसभापती पद देवून खालुंब्रे पट्ट्यातील आ. गोरेंपासून काहीसा दुरावलेला त्यांच्याच बालेकिल्ल्याचा एक भाग पुन्हा मजबूत करण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच खेड तालुक्याचे राजकारण भगव्या वळणावर आले असल्याने प्रस्थापित राष्ट्रवादी पुढे आणि भाजपमधील विरोधकांच्या पुढे सेनेचे आमदार गोरे यांचा हा वारू कसा रोखायचा हेच पुढील काळातील खरे आव्हान असणार आहे.

राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला प्रथमच सुरुंग –

 राष्ट्रवादीने खेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा मिळतील व पंचायत समितीमध्ये बहुमत मिळेल असा दावा केला होता. प्रत्यक्षात राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या केवळ 2 जागांवर आणि पंचायत समितीच्या 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.  त्या तुलनेत शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या 3 व पंचायत समितीच्या 7 जागा काबीज करून पंचायत समितीवर भगवा फडकविला आहे.  सेनेपाठोपाठ भाजपला जिल्हा परिषदेच्या 2 व पंचायत समितीच्या 2 जागांवर यश मिळाल्याने भाजपच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काँग्रेसने पंचायत समितीमध्ये एक जागा मिळवूनही उपसभापतीपद पदरात पडून घेतले आहे. या धक्कादायक स्थितीने खेड तालुक्यातील यापूर्वीच्या राष्ट्रवादीची एकहाती सत्तेला प्रथमच सुरुंग लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.