थकीत पगारासाठी कचरावेचक व वाहनचालकांचे निगडी येथे आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब व फ क्षेत्रीय कार्यालयातील कचरावेचक व कचरा गाडीवरील वाहनचालकांनी थकीत पगार व  इतर मागण्यांसाठी आज (शुक्रवारी) एक दिवसाचा संप पुकारला आहे. प्रशासनाकडून मंगळवारपर्यंत पगार दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे मात्र जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार असल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे.

हा संप कर्मच्या-यांनी निगडी येथील हेगडेवार भवन येथे केला. या संपामध्ये 50 वाहनचालक व सुमारे 40 कचरावेचक कामगार सहभागी झाले होते. कंत्राटदार पद्धतीने प्रत्येक गाडीवर एक वाहनचालक व दोन कचरावेचक कर्मचारी असे एकूण 80 वाहनचालक  व 160 कचरावेचक कर्मचारी काम करतात. या कर्मच्या-यांना गेले तीन महिने  पगार मिळत नासल्याने हा संप करण्यात आला. तसेच पावसाळी रेनकोट, गमबूट, हातमोजे, मास्क अशी आदी आवश्यक साधन सामग्रीही पुरवली जात नसल्यामुळे हा संप पुकारण्यात आला आहे.

त्याचबरोबर भविष्यनिर्वाह निधी, इएसआय पगारातून किती कापला जातो, त्याचा हिशोब व  पुरावे दिले जात नाहीत. तसेच पगार वेळेवर होत नाहीत. पगाराविषयी विचारले असता ठेकेदर केवळ आश्वासन देतात. किंवा दमदाटी करुन कामावरुन काढून टाकण्यात येते. गेली पाच वर्ष हीच परिस्थिती आहे.  आम्हाला न्याय मिळवून द्या, अशा स्वरुपाचे निवेदन कर्मच्या-यांनी  फ क्षेत्रीय अधिकारी  मनोज लोणकर यांना दिले.

याविषयी लोणकर यांना विचारले असता ते म्हणाले की, निवडणुकांमुळे कंत्राटदारांची बिले काढली नव्हती. ती बिले काढण्यात आली आहेत. मात्र मध्यंतरी आलेल्या सुट्ट्यांमुळेही थोडा विलंब झाला आहे. मात्र त्यांचे काम मार्गी लागले असून येत्या मंगळवारपर्यंत त्यांची पगार त्यांना मिळणार आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.