शनिवार, डिसेंबर 3, 2022

निगडीत टोळक्याचा धुडगूस; एकाला बेदम मारहाण, दोघे गजाआड

एमपीसी न्यूज – पुर्ववैमनस्यातून पाच ते सात जणांच्या टोळक्याने एकाला सिमेंटच्या ब्लॉकने बेदम मारहाण केली. तसेच घराची आणि वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.  ही घटना बुधवारी (दि.15) रात्री साडेनऊच्या सुमारास पंचतारानगर, आकुर्डी येथे घडली. 

याप्रकरणी तेजस राजु तापकीर (वय 20) आणि आदर्श करण कडाली (वय 18, दोघे रा. पांढरकरनगर, आकुर्डी) या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या तोत्या या नावाच्या साथीदारासह तीन ते चार जणांविरोधात दंगल माजविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बशीर इमाम हवालदार (वय 42, रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी आणि फिर्यादीची पूर्वी भांडणे झाली आहेत. त्यातून त्यांच्यात वैमनस्य आहे. बुधवारी रात्री फिर्यादी बशीर राहत्या घरात कपड्यांना इस्त्री करत होते. त्यावेळी आरोपी आदर्श, तोत्या आणि तेजस तिथे आले. आदर्श याने बशीर यांच्याकडे बोट दाखवून मागील प्रकरणात याला मारायचे आहे, असे म्हणत शिवीगाळ केली, असे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी बशीर यांना सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. बशीर यांचा मेव्हणा भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आला असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केल्याचे, पोलिसांनी सांगितले. यामध्ये बशीर आणि त्यांच्या मेहुण्याच्या डोक्याला, हाताला मार लागला आहे. 
 

आरोपींनी आपल्या इतर तीन ते चार साथीदारांना बोलावून घेतले. लाकडी दांडक्याने घराच्या दरवाजा, खिडकीची तोडफोड केली. तसेच वाहनाचेही नुकसान करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. निगडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित पवार तपास करत आहेत.

Latest news
Related news