नियम शीथील झाल्यामुळे पासपोर्ट काढण्याकडे लोकांचा कल वाढला – अतुल गोतसुर्वे

एमपीसी न्यूज – पूर्वी पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया किचकट असल्याने बहुतांश नागरिक पासपोर्ट काढण्याचे टाळतात. त्यामुळे आपल्या देशात फक्त 4 टक्के म्हणजेच 6 ते 7 कोटी लोकांजवळच पासपोर्ट आहेत. परंतू  26 डिसेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेत अनेक बदल केले. नियमात शिथीलता आणल्यामुळे त्यामुळे पासपोर्ट काढण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. एकट्या पुणे शहरात पासपोर्ट काढण्याच्या प्रक्रियेत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशी माहिती विदेश मंत्रालयाचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी दिली.

पत्रकार भवन येथे आयोजीत पत्रकारांशी वार्तालाप या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे आणि सरचिटणीस अजय कांबळे उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, पासपोर्ट काढण्यासाठी फक्त तीन कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेचे आहे. त्यामध्ये नागरिकांचा संपूर्ण पत्ता असलेले कागदपत्र,  जन्माचा पुरावा आणि  फक्त काही ठिकाणीच दहावी पास असल्याचा दाखला, हे तीन कागदपत्र असतील तर फक्त 1500 रुपयात पासपोर्ट मिळणार असल्याचे गोतसुर्वे यांनी सांगितले.

पासपोर्ट आता गरजेची वस्तू झाली आहे. अनेक कारणांसाठी पासपोर्टची आवशक्यता भासत आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षेसाठी पासपोर्ट गरजेचा आहे , व्यवसायाच्या कक्षा विस्तारल्याने त्यासाठी पासपोर्ट गरजेचा आहे, पर्यटनाच्या दृष्टीने पासपोर्ट गरजेचा आहे, त्यामुळे पासपोर्ट आता सर्वांची गरज बनला आहे. भारतात पासपोर्ट धारकांपैकी 40 टक्के वाटा महिलांचा असल्याचे त्यांनी सांगितले.

 पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी साधारण 40 दिवसांचा कालावधी लागत होता. परंतू आता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हाच कालावधी निम्यावर आला आहे. टॅबच्या सहाय्याने प्रक्रिया पूर्ण होत असल्याने आता फक्त 21 दिवसांत पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण होत आहे.  आगामी काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये पासपोर्टसाठी काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट अॅक्टनुसार पोस्ट ऑफीसला अधिकार देणार आहे. आगामी काही दिवसांत सरकारची ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.