नाट्यसंस्कार कला अकादमी घेणार नाट्याच्या परीक्षा

एमपीसी न्यूज – “भालबा केळकर करंडक”, “दिवाकर स्मृती नाट्यछटा” अशा बालनाट्यविश्वातील प्रतिष्ठित समजल्या    जाणा-या स्पर्धांचे आयोजन नाट्यसंस्कार कला अकादमी गेली अनेक दशके करत आहे. मात्र, आता जागतिक बालरंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वतीने यंदाच्या वर्षीपासून बालनाट्यांच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. 20 मार्च जागतिक बालरंगभूमी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, तबला पेटी, चित्रकला यांच्या परीक्षा देता येतात. त्याचे मार्क आता दहावीच्या गुणांमध्ये वाढू शकतात. पण या सगळ्यांचा समावेश असलेली नाटक ही कला मात्र केवळ परीक्षा नाही म्हणून दुर्लक्षिलेली होती. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याने अध्यादेश काढलेला असून तो अभिनंदनीय आहे. परंतू त्यात राज्य बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक प्राप्त तीन क्रमांकांना गुण मिळणार आहेत.

या स्पर्धेत महाराष्ट्रात अनेक केंद्रांवर हजारो बाल कलाकार सहभागी होतात. तसेच शिबिराच्या माध्यमातून रंगमंचावर येतात. बालनाट्यात किंवा शिबिराच्या माध्यमातूनही सहभागी होतात. पण त्यांना परीक्षा नाही म्हणून गुण मिळू शकत नाहीत, म्हणूनच नाट्यसंस्कार कला अकादमीने यावर्षीपासून परीक्षा घेण्याचे ठरविलेले आहे. नाट्यसंस्कार कला अकादमीला महाराष्ट्र शासनाची अधिकृत मान्यता मिळालेली आहे.

खालील तीन टप्प्यात परीक्षा घेण्यात येणार आहेत.

अ.क्र.    परीक्षेचे नाव        वयोगट            परीक्षेचा दिनांक     
1    बालनाट्य संस्कार        5 ते 8                  मे 2017     
2    किशोर नाट्यसंस्कार    9 ते 12                 मे 2018     
3    कुमार नाट्यसंस्कार    13 ते 16                मे 2018    

पहिली परीक्षा तोंडी आणि प्रात्याक्षिक स्वरुपात असेल त्याचबरोबर या परीक्षेचे चित्रीकरण केले जाणार आहे. 20 मार्चला जागतिक बालरंगभूमी दिनी परीक्षेचा अभ्यासक्रम, माहितीपत्रक वेबसाईटवर तसेच संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.