अभंग रंगात रंगली तळेगावकरांची तुकाराम बीज…..

कलापिनी व श्री विठ्ठल मंदिर संस्थानची तळेगावकरांना सुरेल भेट

एमपीसी न्यूज – मैत्रीय मराठे यांनी सादर केलेल्या ओंकार प्रधान…….,व जेथे जातो तेथे तू माझा सांगाती या रचना, तर स्वप्नील झळके यांचे तू माझी माउली….व गोविंद गोविंद, मयूर पाटीलच्या जोहार मायबाप…..आणि पंढरीचे भूत मोठे…या रचनांनी रसिक भाविकांची मने जिंकली. अक्षय म्हाप्रळकर यांनी भाव तिथे देव ही रचना सादर केली तर विभावरी बांधवकर यांनी मारू बिहाग रागातील कोटी पुण्य जन्म, बैरागी रागातील बोलावा विठ्ठल…., आणि अणुराणीया तोकडा….या रचना सादर करून कार्यक्रमावर आपला वेगळा ठसा उमटविला.

तुकाराम बीजेचे औचित्य साधून श्री. विठ्ठल मंदिर संस्थान तळेगाव दाभाडे यांनी कलापिनी कला अकादमीच्या कलाकारांच्या सुरेल अभंगवाणीचा कार्यक्रम तळेगाव येथील जगद्गुरू संत तुकारामांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या विठ्ठल मंदिरात आयोजित केला होता. सर्व कलाकारांनी एकत्रितपणे केलेल्या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी तुका सेज… हे तुकारामांच्या अभंगाचे इंग्रजी रुपांतर सादर केले आणि उपस्थितांची दाद मिळवली. कलापिनी पुढच्या वेळी इंग्रजीत अभंग वाणी सादर करू शकते, असेही सांगितले. अभंगवाणीच्या सुरेल अनुभूतीमुळे भाविक रसिक वर्ग तृप्त झाला.

 

या सुरेल कार्यक्रमाचे सुरेल निवेंदन माधुरी ढमाले यांनी केले आणि या कार्यक्रमाला मंगेश राजहंस (तबला), गोरख कोकाटे(पखवाज),कोमल कोकाटे (टाळ) आणि प्रदीप जोशी ( संवादिनी) यांनी सुंदर साथ संगत करून कार्यक्रमाची उंची वाढविली. श्री.विठ्ठल मंदिर संस्थानचे माउली दाभाडे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.संतोषजी  खांडगे यांचे हस्ते कलाकारांचा सन्मान केला. कार्यक्रमाची सांगता हेची दान देगा देवा या भैरवीने झाली.

नेटके संयोजन श्री.विठ्ठल मंदिर संस्थानच्या कार्यकर्त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.