बीआरटी मार्ग दुचाकीसाठी खुला करण्याच्या आत्मघातकी निर्णयास तत्काळ स्थगिती द्या

पीएमपी प्रवासी मंचची मागणी


एमपीसी न्यूज – निगडी ते दापोडी या रस्त्यावर उभारलेला बीआरटीएस मार्ग दुचाकीस्वारांसाठी सोमवार (दि.20) पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील यांनी दिली होती. पीएमपी प्रवासी मंचने त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शविला असून या आत्मघातकी निर्णयास तत्काळ स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली.

 

या निर्णयामुळे वाहतुकीच्या समस्येत भरच पडणार आहे. स्वतंत्र जलद सुरक्षित मार्ग दिल्याने रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत वाढच होणार आहे. निर्दोष, सुरक्षित, त्रुटीरहित बीआरटी (दापोडी-निगडी ) मार्ग सुरू करण्याऐवजी, खासगी वाहन वापरास प्रोत्साहन देणाऱ्या "केंद्रीय निधीतून 6-7 वर्षे तयार असलेला बीआरटी मार्ग दुचाकीसाठी खुला करण्याच्या निर्णय आत्मघातकी असल्याचे पीएमपी प्रवासी मंचने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

नगर रोडवरील बीआरटीचा अनुभव अत्यंत विदारक आहे 3 ते 4 वर्ष हा मार्ग विनावापर पडून होता. तेव्हा स्थानिक नेत्यांनी व नागरिकांनी या मार्गाची मोडतोड केली. त्यानंतर बीआरटी सुरू केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यानंतर मार्ग सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. एक वर्षानंतर ही अपेक्षित सक्षमता व प्रवासांची सुरक्षितता साध्य करता आली नाही. हे उदाहरण ताजे असतानाच दापोडी-निगडी या मार्गावर वेगळे काय घडणार आहे?

 

2009-2010 या वर्षात जेएनएनयूआरएमतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवडसाठी बीआरटी व 650 बसेस मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाने सुमारे 500 कोटी दिले. पुढील 2-3 वर्षात शेकडो कोटी खर्चून, दापोडी ते निगडी बीआरटीचा मार्ग उभारला 36 बस थांबे उभारण्यात आले. इतका सर्व खर्च केला असताना त्याठिकाणी बीआरटी वाहतूक सुरू करणे गरजेचे असताना त्याऐवजी खासगी वाहनांना प्रोत्साहन देण्याचे काम या माध्यमातून होत असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.