पुणेकर पाण्यावाचून वंचित राहणार नाही याचे नियोजन करू – मुक्ता टिळक

रोटरी क्लबच्या ‘जलोत्सव 2017‘ मध्ये महापौरांची घोषणा

एमपीसी न्यूज – पाणी हा पुण्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे आगामी काळात योग्य वितरणाद्वारे वाया जाणाऱ्या पाण्यावर नियंत्रण, मीटरद्वारे पाणी, 24 तास पाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग या सर्व मुद्द्यांवर काम करून पुणेकर पाण्यावाचून वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊ ‘ अशी घोषणा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी सायंकाळी केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे रोटरी क्लब 3131 आयोजित ‘जलोत्सव 2017 ‘मध्ये त्या बोलत होत्या. यावेळी महापौरांचा सत्कार पुष्पा घळसासी, सुरेखा पाठक आणि जलोत्सव संयोजक सतीश खाडे यांच्या हस्ते झाला. तसेच यावेळी ग्रामगौरव, जलदिंडी, पाणी पंचायत, एक्वाडॅम या स्वयंसेवी संस्थांचा सत्कार आज रवी धोत्रे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

टिळक म्हणाल्या की, 24 तास पाणी पुरवठा केला की पाण्याचा वापर मर्यादित राहतो, पाणी साठवणुकीची भीती राहत नाही आणि ते ओतूनही दिले जात नाही. त्यामुळे 24 तास पाणीपुरवठा करण्याचा विचार आम्ही करीत आहोत. पालिकेच्या मिळकती, इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची मोहीम हाती घेणार आहोत. रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये रोटरीसारख्या स्वयंसेवी संस्थांनी पालिकेला मदत करावी.  मीटरद्वारे पाणी देण्याचाही प्रयत्न राहणार आहे.

जुन्या फुटक्या जलवाहिन्या बदलल्या तर बरेच पाणी वाचू शकणार आहे. पाण्याचे वितरण नीट केले तर पुण्याच्या वाट्याचे पाणी नीट वापरून सुद्धा वाचवता येणार आहे. पुणेकर पाण्यावाचून वंचित राहणार नाही याचे नियोजन करू. जलसंधारणाचे परिणाम दिसायला उशीर लागला तरी ते प्रयत्न वाया जात नाहीत’ असेही त्यांनी जलसंधारणाबाबत सांगितले. 

जलोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज सायंकाळी ‘पाणी आणि वैज्ञानिक चमत्कार ‘ या विषयावर अभ्यासक डॉ. अविनाश खरात, सुनील पिंपळकर यांनी विचार मांडले. ‘कृत्रिम पाऊस ‘ या विषयाची माहिती अभिजीत घोरपडे यांनी दिली. उमेश नाईक, चेतन गोगावले यांनी ‘प्लास्टिक विरहित शेततळी ‘प्रयोगांची माहिती दिली.

परेश गांधी यांनी सूत्र संचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.