जनतेची अचूक नाडी ओळखणारा वैद्य

(रवींद्र अमृतकर, समन्वयक, महाराष्ट्र प्रदेश भाजपा.)

 

एमपीसी न्यूज – गेल्या अडीच वर्षात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी आपले नेतृत्व गुण सिद्ध करत पक्षाच्या यशोमय वाटचालीत आपले योगदान दिले आहे. ज्या विश्वासाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शाह यांनी खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली तो विश्वास खा. दानवे यांनी सिद्ध करून दाखवला आहे. अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवावी याबाबत विचारमंथन सुरु झाले. अखेर ती जबाबदारी पक्षात सर्वाधिक ज्येष्ठ असलेल्या आणि पंचायत ते संसद असा यशस्वी राजकीय प्रवास करणाऱ्या खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्यावर सोपविण्याचे निश्चित झाले. खा. दानवे साहेबांच्या पाठिशी राजकारणाचा दीर्घ अनुभव होता.

पक्षाच्या स्थापनेपासून सर्वच नेत्यांसोबत त्यांनी काम केलेले होते. सरपंच ते केंद्रीय मंत्री आणि पक्षातील बूथ अध्यक्ष ते प्रदेश महामंत्री आणि केंद्रीय कार्यकारिणीत पदाधिकारी अशी अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषविली होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच पदापासून झाली असल्याने राजकीय प्रवासातील खाचखळगे त्यांना ठाऊक आहेत.

कोणतेही राजकीय संकट आले तर त्यावर मात कशी करायची याचा अनुभव त्यांना स्वतः अनुभवलेल्या राजकीय अडचणींतून आपोआपच मिळाला आहे. अस्सल ग्रामीण बाज असलेली ढंगदार भाषण शैलीतील त्यांची भाषणे हा कार्यकर्त्यांचा आवडीचा विषय असतो. आपला मुद्दा समोरच्याला गोष्टीच्या रुपात समजावून सांगण्याची पद्धत ही त्यांच्या भाषणाची खासियत असते.           

 

दोन वेळा आमदार, चार वेळा खासदार राहिलेल्या खा. दानवे साहेबांनी राजकारणातील चढ-उतार जवळून पाहिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व ग्रामीण भागात निर्माण करण्यासाठी कोणकोणत्या दिव्यांना सामोरे जावे लागते, हे त्यांनी अनुभवले आहे. पक्षाच्या उभारणीच्या काळात त्यांनी संघटनेसाठी योगदान दिले आहे. पक्ष यशोशिखरावर असताना पक्षाचे उभारणीचे दिवस विसरून चालणार नाहीत हे सुद्धा त्यांना चांगलेच ठाऊक आहे.

पंचायत ते संसद ही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष पदी पंचायत ते संसद यशस्वी राजकीय प्रवास केलेल्या खा. दानवे साहेबांची केलेली निवड किती सार्थ आहे हे लक्षात येत आहे.  सत्तेत असताना उतायचे नाही, मातायचे नाही ही पक्षनेतृत्वाने दिलेली शिकवण साहेबांनी प्रत्यक्षात आणली आहे, त्यामुळेच सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवताना ते आपले जमिनीवरचे पाय कधीच हलू देत नाहीत.

सामान्यातल्या सामान्य माणसाशी घट्ट नाळ जोडून साहेबांनी राजकारणातील वाटचाल यशस्वीरित्या केली आहे. दोन वेळा आमदार, चार वेळा खासदार होणे ही गोष्ट सोपी नाही त्यांनी ही गोष्ट लिलया साध्य केली आहे.

जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील जनता साहेबांकडे आपापले प्रश्न, विवंचना घेऊन येत असते. सामान्य माणसाचे वेगवेगळे प्रश्न सोडविताना साहेब आपले सारे कौशल्य पणाला लावतात. त्यामुळेच त्यांची मतदारांशी घट्ट नाळ जुळली आहे. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना उभारून, सिंचन सुविधा देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धीचे नंदनवन फुलविण्याचे स्वप्न सत्ता आल्याशिवाय त्यांनी साकारले होते. पक्ष सत्तेवर आल्यावर निर्माण झालेल्या दुग्धशर्करा योगाची प्रचिती आता दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना विकासाच्या रूपाने लवकरच अनुभवता येणार आहे.

भारतातील पहिले असे जालन्याला होत असलेले ड्रायपोर्ट, आसपासच्या जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग, जालना शहरात सिमेंटचे रस्त्याचे होत असलेले जाळे, शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नाची होत असलेली सोडवणूक, जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी येत असलेला नियोजित पशुउत्पादक कंपन्या सुरु करण्याचा उपक्रम, जालना लोकसभा मतदार संघात शासकीय योजनेतून आणि लोकसहभागातून स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून केलेली जलयुक्त शिवारची कामे हि त्यांची यशस्वी लोकप्रतिनिधी असल्याची विकासकामांची यादी आहे.

यापूर्वी सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांमधील वाद संबंध महाराष्ट्राने अनुभवले आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री या जोडगोळीमध्ये असलेला समन्वय आणि सुसंवाद याचे प्रतिबिंब पक्षाला मिळालेल्या जनादेशात दिसून आले आहे. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पदाला योग्य न्याय देण्याचा उद्देशाने साहेबांनी अपार मेहनत घेतली आहे. सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होणे ही गोष्ट सोपी नसते. विरोधी पक्षात राहून सत्ताधारी पक्षांच्या चुकांवर बोट ठेवत आपल्या पक्षाचा पाय विस्तारणे सोपे असते.

मात्र, सत्ताधारी पक्षात राहून पक्षाचे संघटन मजबूत करणे महाकठीण असते. याची अनेक कारणे असतात. सत्तेमुळे कार्यकर्त्यांत शैथिल्य आलेले असते. सत्तेत राहून काय काम केले, याचा लेखाजोखा मांडून मतदारांपर्यंत पोहचवायचे असते. केलेल्या कामाच्या आधारे मते मागायची असतात. म्हणजेच सकारात्मक मानसिकतेने सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळावे लागते.

साहेबांनी आपला सारा अनुभव पणाला लावून प्रदेशाध्यक्ष पदाचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने अनेक विकासयोजना मार्गी लावल्या आहेत. यात विकास योजनांची माहिती संघटनेमार्फत तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेल्या नियोजन कौशल्यची प्रचिती साहेबांनी गेल्या दोन वर्षात दिली आहे.

फडणवीस सरकारच्या विकासोन्मुख कारभाराला पक्षसंघटनेची समर्थ साथ मिळाल्यामुळे. पंचायत ते संसद ही भाजप पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची घोषणा हळू-हळू प्रत्यक्षात येऊ लागली आहे. गेल्या वर्ष दीड वर्षात साहेबांच्या नेतृत्व कौशल्याची कसोटी लागली होती.

यापूर्वी झालेल्या कल्याण-डोंबिवली, पालघर, औरंगाबाद, नवी मुंबई या महापालिकांच्या निवडणुका, नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये, पक्षाने लक्षणीय यश मिळवले. कल्याण-डोंबिवली मध्ये मागील निवडणुकीपेक्षा पाचपट जागा पक्षाला मिळाल्या. पालघर जिल्हा परिषद स्वबळावर ताब्यात आली आहे.

औरंगाबादेतही मागील निवडणुकीपेक्षा पक्षाच्या जागांमध्ये चांगली वाढ झाली. गेल्या तीन चार महिन्यात झालेल्या नगरपालिका आणि 10 महापालिकांच्या तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका यात पक्षाने मिळविलेले दणदणीत यश साहेबांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी ठरणारे आहे. कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाला आपल्या नेतृत्वाखाली पक्षाचा पाया विस्तारावा अशी इच्छा असते. त्यासाठी लागणारी मेहनत साहेबांनी घेतल्याने पक्षाच्या नेत्रदीपक वाटचालीत त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षसंघटनेकडून आवश्यक ती साथ देण्याचे काम साहेबांनी केले आहे. या निवडणुकांच्या प्रचारात साहेब आणि मुख्यमंत्री पायाला भिंगरी लावून राज्यभर हिंडले. पक्ष संघटनेच्या अभियानांसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांचा तीन वेळा दौरा आतापर्यंत साहेबांनी केला आहे. प्रचाराच्या निमित्ताने राज्यातील जनतेचे प्रश्न समजावून घेता येतात आणि सरकारने केलेली कामे जनतेपुढे ठेवता येतात. ही संधी साहेबांनी साधली. सरकार आणि पक्षसंघटना हातात हात घालून चालत असेल तर पक्षाला निवडणुकांमध्ये विजय मिळवणे सोपे जाते.

गेल्या काही महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या मोठ्या यशामागे प्रदेश नेतृत्वाच्या नियोजनाचा सिंहाचा वाटा आहे. महापालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या भरघोस यशामुळे विरोधकांना हादरा बसला आहे.

पूर्वी पक्षाचे नाममात्र अस्तित्वही नव्हते अशा लातूर ग्रामीण, पुणे, पिंपरी-चिंचवड शहर अशा ठिकाणीही पक्षाने भरघोस यश मिळवले आहे. 1992 पासून भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपने युती म्हणून लढविल्या होत्या. त्यामुळे यावेळी स्वतंत्र लढताना पक्षसंघटना सज्ज ठेवणे ही गोष्ट अत्यंत कठीण होती. प्रदेशाध्यक्ष साहेबांनी पक्षसंघटनेला स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी वाटचाल या पुढील काळातही चालू राहणार आहेच, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपआपले योगदान त्यात दिले पाहिजे. 

केंद्र आणि राज्यातील विकासकामांचा सामाजिक जाणिवेतून चालणारा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्याचे बळ साहेबांना देण्यासाठी साहेबांच्या वाढदिवसानिमिताने आपण पंतप्रधान मोदीजींच्या प्राधान्यक्रमातील बेटी पढाओ, डिजीटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल यासाठी करावयाच्या मुलभुत सुविधांसाठी छोट्या उपक्रमांना हातभार लावणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्वकांक्षी उपक्रमाला साथ देणे याच खऱ्या शुभेच्छा असतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.