पतीच्या कामातूनच घेतले राजकारणाचे धडे – माधवी राजापुरे

एमपीसी न्यूज – पती राजेंद्र राजापुरे हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात 1989 पासून कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक व राजकीय कामात सहकार्य करत करतच मी राजकारणात पाऊल ठेवले, अशी भावना माधवी राजापुरे यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना व्यक्त केली.

राजेंद्र राजापुरे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाला सुरुवात केली. त्यांनी 2002 साली नगरसेवकपदही मिळवले पुढे ते महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष झाले. या सा-या प्रवासात माधवी राजापुरे यासोबत होत्याच. यावेळी घरी येणारी मंडळी, त्यांच्या ओळखी, पतीला साथ म्हणून प्रत्येक सामाजिक कामात घेतलेला सहभाग यातून त्यांची राजकीय पार्श्वभूमी घडत गेली. याच आधारावर माधवी राजापुरे यांनी 2012 सालीही निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला. यावेळी मात्र त्या पूर्ण तयारीनिशी निवडणुकीत उतरल्या  व त्यांनी विजय मिळवला.

याविषयी बोलताना माधवी राजापुरे म्हणाल्या की, आमचे मूळ गाव सातारचे वाई आहे. माझे माहेर देखील तेच आहे. पतीच्या नोकरीसाठी आम्ही सातारा सोडून पिंपरी-चिंचवडला आलो. येथे आल्यानंतर पतीच्या राजकारणाच्या आवडीमुळे त्यांनी राजकारणात प्रवेश केला व त्यानंतर मी ही आले. घरात व इतर सामाजिक कामात त्यांना मदत करता-करता माझाही जनसंपर्क वाढला. महिलांविषयी विविध कामे यावेळी मी केली. त्यामुळे निवडणुकीत उमेदवार म्हणून उभारण्याचा आत्मविश्वास माझ्यात आला. त्यातूनच मी दोनवेळा निवडणूक लढवली व नगरसेवकपद झाले.

मला ही संधी माझ्या प्रभागातील नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे मी प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षापूर्ण करण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल. रस्ते, कचरा, पाणी पुरवठा याबरोबरच महिलांना रोजगार, त्यांच्या इतर समस्या आदीवर येत्या पाचवर्षात मला काम करायचे आहे, अशीही इच्छा त्यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना व्यक्त केली.

राजापुरे यांना खेळाची आवड असून त्यांनी 12 पर्यंत कब्बडी, खो-खो अगदी व्हॉलीबॉल सारखे सुद्धा खेळ त्या काळी खेळले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.