शनिवार, डिसेंबर 3, 2022

कोथरूड येथे काँग्रेस नगरसेविकेच्या कार्यालयातील कर्मचा-यास मारहाण

शिवजयंतीसाठी कमी वर्गणी दिल्याच्या रागातून टोळक्याचे कृत्य

एमपीसी न्यूज – 15 मार्च रोजी झालेल्या शिवजयंतीसाठी 1 लाख रुपये वर्गणीची मागणी केली असतानाही फक्त 5 हजार रुपये दिले. या कारणावरून 7 जणांच्या एका टोळक्याने कोथरूड येथे काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली मराठे यांच्या कार्यालयातील कर्मचा-यास मारहाण केली. याप्रकरणी सात जणांच्या टोळक्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तुषार साळुंखे (वय-26, रा.कोथरूड, पुणे) यांनी फिर्याद दिली असून सुधीर दत्तात्रय सुतार (वय-29, रा. जयभवानी नगर, कोथरूड, पुणे), सचिन सुतार, संदीप सकपाळ, तुषार खामकर, अनिकेत वाटणे, प्रवीण माझिरे, नगीन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सुधीर सुतार याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, काल (17 मार्च) रोजी फिर्यादी हे मित्रांस बोलत उभे असताना आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून आले आणि त्यांनी शिवजयंतीसाठी 1 लाख रुपये वर्गणी मागितली असताना फक्त 5 हजार रुपये दिले. या कारणावरून लाकडी बांबुच्या सहाय्याने त्यांना मारहाण केली.

वैशाली मराठे यांच्या जनसंपर्क कार्यालयावर देखील आरोपींनी लाथांनी प्रहार केले. आजूबाजूला असणा-या लोकांना शिवीगाळ केली, त्या ठिकाणी असलेला जिलेबीचा स्टॉल लाथ मारून खाली पाडला, रोडवर उभ्या असलेल्या दुचाकी खाली पाडल्या आणि कोयत्याचा धाक दाखवत तेथून निघून गेले.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक डी.के.वणवे अधिक तपास करीत आहेत.

Latest news
Related news