सचिन साठे यांचा राजीनामा मंजूर करा; काँग्रेसच्या पदाधिका-यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्याची मागणी शहर काँग्रेसच्या पदाधिका-यांनी केली. 

 

शहरातील काँग्रेसच्या निवडक पदाधिका-यांनी आज (शनिवारी) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली. साठे यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला असल्याचे सांगत त्यांचा राजीनामा स्वीकारून मंजूर करण्याची मागणी पदाधिका-यांनी केली आहे.

 

पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, माजी नगरसेविका निगार बारस्कर, रामचंद्र माने, शहर काँग्रेसचे चिटणीस सचिन कोंढरे, एनएसयुआयचे माजी अध्यक्ष निलेश भोईर, उमेश बनसोडे, दिलीप पांढरकर, अॅड. हनुमंत जाधव याच्यासह आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

 

शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिलेला राजीनामा फेटाळला असल्याचे वृत्त निराधार आहे. राजीनाम्यावर अद्यापपर्यंत निर्णय घेतला नाही. राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवड झाल्यावर त्याच्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले आहे, असे सूत्रांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणी उमेदवार का दिले नाही, उमेदवारी वाटप करताना, कार्ड कमिटीला विश्वासात का घेतले नाही, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

 

पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेस संघटना नव्याने बांधण्यासाठी शहरातील कार्यकर्त्यांना ताकद द्यावी. शहराध्यक्षांनी दिलेला राजीनामा त्वरित मंजूर करावा. सर्वांना बरोबर घेऊन जाणा-या, पक्षाची आणि शहराची जाण असणा-या कार्यकर्त्याची शहराध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशीही मागणी  बैठकीतील पदाधिका-यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे केली.

 

पिंपरी-चिंचवड शहर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. गेल्या 15 वर्षात शहरात काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. त्यामुळे शहरातील काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.