शनिवार, डिसेंबर 3, 2022

सांस्कृतिक धोरणांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी – पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या सांस्कृतिक धोरणा अंतर्गत येत्या 21 ते 23 मार्च दरम्यान अभिनय कार्यशाळा, एकांकीका तसेच नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.  यात स्थानिक कलाकारांना नाटय आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत लेखक, दिग्दर्शक, अभिनेते मार्गदर्शन लाभणार आहे. सर्व कार्यक्रम विनामुल्य असून नागरिकांसाठी खुले असणार आहेत.

आपल्या शहरात विविध संस्था प्रायोगिक आणि व्यावसायिक स्तरावर कार्य करतात. या कलाकारांच्या कलेला दाद देण्यासाठी त्यांचे प्रयोग या कार्यक्रमात होणार आहेत. स्थानिक कलाकारांच्या उत्तमोत्तम एकांकिका या कार्यक्रमात आयोजित करण्यात आल्या आहेत. शहरातील स्थानिक कलाकारांच्या 6 एकांकिकांचा यात सहभाग असेल. सर्व कार्यक्रम निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील मनोहर वाढोकर सभागृहात होतील.

तीनदिवसीय अर्थात 21 ते 23 मार्च दरम्यान आय़ोजित कार्यक्रमात दररोज विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.  मंगळवार दि. 21 मार्च रोजी अभिनय कार्यशाळा होईल. पहिल्य़ा सत्रात  सकाळी 9 ते 12 या वेळात वक्ते अतुल पेठे (सुप्रसिद्ध  नाटय लेखक दिग्दर्शक) यांचे मार्गदर्शन कलाकारांना मिळेल. दुस-या सत्रात दुपारी 12.30 ते 3.30 या वेळात सुप्रसिद्ध नाटय लेखक, दिग्दर्शक, अभिनेते योगेश सोमण मार्गदर्शन करतील.

बुधवार दि.22 मार्च रोजी अभिनय कार्यशाळेच्या तिस-या सत्रात सुप्रसिद्ध लेखक,निर्माता,दिग्दर्शक  असलेले श्रीरंग गोडबोले तर दुस-या सत्रात चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके मार्गदर्शन करतील.

मंगळवार दि. 21 मार्च रोजी  सायंकाळी 5 ते 8 या वेळेत देवाक काळजी, कोरड, द कॉंशन्स य़ा तीन एकांकिका सादर होतील. बुधवार दि. 22 मार्च सायंकाळी 5 वाजता  अथर्व थिएटर्स निर्मित मोरूची मावशी हे नाटक सादर होईल.  तर गुरुवारी दि. 23 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत गिनीपिग्स, दृष्टी, समोरासमोर या एकांकिका सादर होतील.

अभिनय कार्यशाळा सर्व वयोगटासाठी खुली आहे, तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
Latest news
Related news