शनिवार, डिसेंबर 3, 2022

अमेरिकेतील भारतीय उद्योजकांना संरक्षण देण्यासाठी सरकारचे धोरण काय?

लोकसभेत खासदार श्रीरंग बारणे यांचा तारांकित प्रश्न

एमपीसी न्यूज – अमेरिकेमध्ये औद्योगिक व्यवसाय व आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या व अमेरिकेत व्यवसाय करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी भारत सरकारकडून कोणते धोरण राबविले जात आहे, असा तारांकित प्रश्न खासदार श्रीरंग बारणे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती झाल्यापासून वंशाने भारतीय नागरिक असलेल्या व अमेरिकेत व्यवसाय करीत असलेल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवरून समजते. याच अनुशंगाने खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेमध्ये तारांकित प्रश्न विचारला.

बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2016 मध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत आण्विक उर्जा, संरक्षण आणि सुरक्षा अशा विषयांवर दोन्ही देशामध्ये चांगले संबंध प्रस्थापित केले होते. परंतु अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती झाल्यानंतर अमेरिकेमध्ये औद्योगिक व्यवसाय करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या व्यवसायावर याचा असर पडत असून या मुळच्या भारतीय नागरिकांना आपले व्यवसाय वाचविण्याचे मोठे आव्हान असल्याचे मागील काही दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे. याच काळात काही भारतीयांवर अमेरिकेत हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी व आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी भारत सरकारकडून कोणते धोरण राबविले जात आहे, असा प्रश्न खासदार श्रीरंग बारणे यांनी वाणिज्य आणि उद्योग केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासमोर लोकसभेत उपस्थित केला.

खासदार बारणे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वाणिज्य आणि उद्योग केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, भारत सरकार अमेरिकेमधील आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या व्यवसायासंबंधी अमेरिका सरकार सोबत चर्चा करीत असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकन सरकारचे सचिव व विदेश सचिव यांच्यासोबत चर्चा झाली आहे. भारत सरकार या विषयावर सतर्कतेने विचार करीत असून अमेरिकेत राहत असलेल्या व मुळच्या भारतीय नागरिकांचे अमेरिकेतील व्यवसाय वाचविण्यासाठी तसेच हे व्यवसाय वाढविण्यासाठी भारत सरकार सतर्कतेने लक्ष देत असल्याचे सांगितले, असे खासदार बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Latest news
Related news