धावत्या दुचाकीतून करा मोबाईल चार्ज


रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याचे संशोधन

एमपीसी न्यूज – मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आपल्याला अनेकदा बॅटरी डाऊन होण्याची समस्या निर्माण होते. नेमकी हीच अडचण ओळखून जी.एच.रायासोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अॅण्ड टेकनॉलॉजी पुणेच्या यासीर नवाझ या विद्यार्थ्याने धावत्या दुचाकीतील बॅटरीच्या माध्यमातून मोबाईल चार्ज करणा-या उपकरणाचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे हे उपकरण बाजारात उपलब्ध असलेल्या चायना उपकरणापेक्षा स्वस्त व टिकावू आहे.

इलेक्ट्रानिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाला असलेला यासीर गत एक वर्षापासून या उपकरणावर काम करीत आहे. मात्र त्याला अनेकदा विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु अडचणींवर मात करीत यासीरने या सर्व तांत्रिक समस्या सोडविल्या व हे उपकरण तयार केले. हैदराबाद येथील एका कंपनीने यासीरच्या या उपकरणाला मान्यता देत, सॉफ्ट (SOFT) बाय रानाझटेक नावाने हे उपकरण बाजारात उतरविले आहे. यासीरने बनविलेल्या उपकरणाबाबत कंपनीने त्याच्याशी कायदेशीर बाबी पाळण्यासाठी करार देखील केला आहे. 

अशा प्रकारची अनेक उपकरणे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. अशा उपकरणांची चांगल्या प्रकारे उपलब्धता असताना बाजारातील उपकरणांसारखेच पण तांत्रिकदृष्ट्या सुलभ व हाताळण्यासाठी सोयीस्कर असे उपकरण तयार करणे म्हणजे मोठे आव्हान. हे आव्हान पेलत यासीरने हे उपकरण तयार केले आहे. त्यामुळे ग्राहकांना लहान आकारासोबत पाण्यापासून संरक्षण प्राप्त असलेले सुरक्षित चार्जर उपलब्ध झाले आहे.

या चार्जरसोबत ग्राहकाला एक डाटा केबल मिळणार असून त्यावर सहा महिन्यांची वॉरंटी देण्यात आली आहे. त्यामुळे हे उपकरण विश्वसनीय आणि सुरक्षित असल्याचे यासीरने सांगितले आहे. संशोधनाबद्दल रायसोनी समूहाचे संचालक अजीत टाटिया, रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख म्रीनल बचुते यांनी यासीरचे अभिनंदन केले.
"SOFT"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.