पंचमीचा सण आला !

एमपीसी न्यूज – फार पूर्वीपासून आपल्याकडे नागाला देव मानून पूजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत रुढ आहे. शेतातील उंदरांचा साप नाश करतात म्हणून सापाला शेतकर्‍याचा मित्र म्हणतात. प्राणी व पक्षी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पूर्वी पासून आहे. म्हणूनच आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी हा आहे. नाग या प्राण्याबद्दल आदर रुजवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. परंतु आता कालानुरूप प्रत्यक्ष नागाची पूजा न करता नागाची प्रतिकृती करून त्याची पूजा करावी असे आवाहन निसर्गप्रेमींकडून केले जात आहे.

वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते.

भारतीय संस्कृतीत पूर्वी नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांची पूजा मोठ्या प्रमाणात केली जात असे. परंतु अलिकडील काळात हे चित्र बदलल्याचे पहायला मिळते. अंधश्रध्दा निर्मूलन समिती यासारख्या अनेक सामाजिक संस्थांनी समाजप्रबोधन करत भारतीय नागरिकांना जिवंत सापाची पूजा करण्यापासून परावृत्त केले. त्याऐवजी नागमूर्ती, नागप्रतिमा, मातीपासून तयार केलेल्या सापाच्या प्रतिकृतींची पूजा केली जाऊ लागली.

नागपंचमीचा मुहूर्त साधून यावर्षीपासून भारतात ‘ राष्ट्रीय सर्पदंश जागृती दिवस ‘ साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय सर्पविज्ञान संस्थेचे अध्य अनिल खैरे यांनी दिली. जागतिक आरोग्य संस्थेने आकडेवारीत भारतात दरवर्षी 49, 500 इतके नागरिक सर्पदंशाने दगावतात. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे भारतीय सर्पविज्ञान संस्थेने आणि इतर काही संस्थांनी पुढाकार घेऊन यावर्षीपासून ‘ राष्ट्रीय सर्पदंश जागृती दिवस ‘ साजरा करण्याचे ठरवले आहे. या माध्यमातून सर्पदंश हा आजार नसून एक अपघात आहे त्यामुळे योग्य ती खबरदारी घेतली की तो बरा होऊ शकतो असा माहितीही त्यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.