शेंटिमेंटल — अंतर्मुख करायला लावणारा

एमपीसी न्यूज- पोलीस हा सुद्धा माणूस आहे, त्याला मन आहे, घर-संसार-मुलंबाळं सारे काही आहे, तो तेथेही माणुसकीच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न करीत असतो, पोलिसांच्या मध्ये सुद्धा एक संवेदनशील माणूस दडला असून त्याकडे आपण पहायला हवे, ही मध्यवर्ती कल्पना धरून निर्माते अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके, यांनी आर. आर. पी कॉर्पोरेशन आणि बनी डालमिया, ई. सी. एम. पिक्चर्स ह्या चित्रपट संस्थेतर्फे " शेंटिमेंटल " ह्या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती डॉ. अंबरीश दरक, बनी डालमिया यांनी केली आहे. कथा-पटकथा-संवाद-दिगदर्शन समीर पाटील यांचे लाभले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली असून मिलिंद जोशी, दासू वैद्य, गुरु ठाकूर, यांच्या गीतांना मिलिंद जोशी यांनी संगीत दिलं आहे. या मध्ये अशोक सराफ, उपेंद्र लिमये, विकास पाटील, सुयोग्य गोऱ्हे, रघुवीर यादव, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी असे कलाकार असून सर्वानी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.

मुंबई मधील बी. एन. नगर अंधेरी पोलीस चौकी मध्ये कमिशनर ऑफ पोलीस यांची भेट असते त्यासाठी बी एन नगर चौकीचे मुख्य पोलीस अधिकारी [ विद्याधर जोशी ] सर्वाना सूचना देतात. कमिशनर [ माधव अभ्यंकर ] यांची व्हिजिट होते ते सर्वांची हजेरी घेतात, सर्वाना फैलावर घेतात, सर्व कामाचा तपशील त्वरित पाठवून द्यायला सांगतात. इन्स्पेकटर संदीपान जांभळे [ रमेश वाणी ] सर्व पोलीस अधिकारी यांना ताकीद देऊन तुमच्याकडे असलेल्या केसेचा तपशील पाठवा असे सांगतात. इन्स्पेकटर दिलीप ठाकूर [ उपेंद्र दाते ], पोलीस निरीक्षक सुभाष जाधव [ विकास पाटील ], आणि सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद घोडके [ अशोक सराफ ] ह्यांच्याकडे असलेल्या केसच्या तपासाला सुरवात होते. 

मुंबईत ज्वेलरीच्या दुकानावर पडलेल्या चोरीचा तपास करीत असताना चोरी करणाऱ्या मनोज पांडे [ सुयोग्य गोऱ्हे ] ची माहिती त्यांच्या खबरी माणसांकडून मिळते. लगेच तेथे धाड टाकून ते तपास करतात. त्यांना चोरी केलेले दागिने, हत्यारे, आणि काही कागदपत्रे आणि एक फोटो सापडतो, त्यावरून ते मनोज पांडे तसेच त्याच्या साथीदाराला व्यवस्थित ट्रॅप करून पकडून चौकीत आणून कैदेत ठेवतात.

मनोज पांडे हा तरुण मुलगा मेकॅनिकल इंजिनियर असतो पण परिस्थितीमुळे त्याला चोरी-लबाडीची कामे करावी लागतात. त्याचे लग्न ठरलेले असते, त्याची आई घरी एकटी असते तिला फोन करण्याची विनंती तो प्रल्हाद घोडके यांना करतो. त्यांना त्याची दया येते माणुसकीच्या नात्याने त्याला फोन करायला परवानगी देतात. चोरीचा तपास सुरूच असतो त्यातून कळते की मनोज पांडे ने बरेचसे दागिने बिहारला मोतीहारी येथील आपल्या गावच्या घरी लपवून ठेवले आहेत हे उघडकीस येते. 

तिघे पोलीस अधिकारी मनोज पांडे बरोबर बिहारला रेल्वेने जायला निघतात, प्रल्हाद घोडके हे दोन वर्षांनी निवृत्त होणार असतात. त्या अगोदरच ते ह्या डिपार्टमेंटला वैतागलेले असतात. सतत ड्युटी आणि ड्युटी करावी लागत असल्याने, ते आपले मनोगत प्रवासात बोलून दाखवतात. " आपण सगळे पोलीसमध्ये असलो तरी त्या ह्या वातावरणामध्ये असे " मेंटल " होऊ नका, थोडी माणुसकी ठेवा, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही, आणि तुम्ही माणूस म्हणून सुद्धा जिवंत रहाल, माणूस जन्मताच गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. त्यावेळी मनोज आपली कथा त्या पोलिसांना ऐकवतो. आणि ह्या वाईट मार्गाला कसे आलो ते सांगतो. 

रेल्वेप्रवासात अचानक मनोज गायब होतो, त्याची शोधाशोध सुरु होते, त्याचे खापर प्रल्हाद घोडकेवर दोघेजण फोडतात, तेवढ्यात मनोज तेथे येतो, त्याला फैलावर घेतले जाते. गाडी बिहारमध्ये शिरते आणि अचानक थांबते त्यावेळी तेथे बिरजू भैय्या [ पुष्कर श्रोत्री ] हा मनोज चा मित्र आपल्या बिहारी मंडळी बरोबर गाडीत शिरतो. त्यानंतर गाडी बिहारला मोतीहारी येथे पोहोचते, मनोज आपल्या ताऊजी [ रघुवीर यादव ] यांच्याकडे सर्वाना घेऊन जातो. आपल्या बरोबरचे हे तिघे पोलीस अधिकारी आहेत हे तो त्यांना सांगत नाही. बिहारमध्ये अनेक घटना घडतात, हे सगळे तेथे कसे रहातात, तेथे ताऊजींना मनोजचे खरे स्वरूप काय आहे हे कळते का ? पोलिसांना मनोजने लपवून ठेवलेले दागिने मिळतात का ? शेवटी नेमके काय होते ? मनोजला शिक्षा होते का ? त्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना डिपार्टमेंट त्यांना काय बक्षीस देते ? हे सर्व शेंटिमेंटल ह्या सिनेमात पाहायला मिळेल.

अशोक सराफ, उपेंद्र दाते, विकास पाटील, ह्यांची केमिस्ट्री छान जमली आहे, सोबतीला सुयोग गोऱ्हे, पल्लवी पाटील, रघुवीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, राजन भिसे, विद्याधर जोशी, पुष्कर श्रोत्री, ह्याची साथ उत्तम लाभली आहे, संगीत ठीक आहे, दिगदर्शक समीर पाटील यांनी चित्रपट गतिमान ठेवला असून चित्रपट हा पोलिसांच्या जीवनावर भाष्य करतो.

आजूबाजूला पोलिसांबरोबर घडत असलेल्या घटना, दलात आणि बाहेर तयार झालेलं वातावरण या सगळ्यावर हा सिनेमा अंतर्मुख बनायला लावतो, हल्ली लोकांमध्ये पोलीस हा एक नंबरचा शत्रू आहे अशी भावना तयार व्हायला लागली आहे. पण एका हाताने टाळी वाजत नाही. जनतेनं नियमानं वागायचं ठरवलं तर विरुद्ध जायची काय बिशाद आहे पोलिसांची. लोकांच्यामध्ये पोलिसांच्या बद्दल आता वचक राहिलेला नाही आहे. कारण जनता, राजकारणी आणि गुंड ह्यांनाच तो नकोसा झालेला आहे, सगळ्या समाजाला एक मानसोपचार डॉक्टर ची गरज आहे, तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की आपल्या डिपार्टमेंटमध्ये एखाद्याला काम करावंसं वाटेल असं वातावरण निर्माण करा, पोलिसांच्या विषयी जरा " शेंटिमेंटल " होऊन विचार करा, असे हा चित्रपट सांगून जातो.    

"Shenti

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.