स्वप्नांना पंख राजीनाम्याचे !

(विश्वास रिसबूड )

रात्रभर आपल्या महालात येरझाऱ्या घालून उदयजी महाराजांचे पाय बोलू लागले होते. पण महाराजांना चैन पडत नव्हते. मधूनच त्यांनी अंथरुणाला पाठ टेकवून झोपेची आराधना करण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांच्या डोळ्यावरून झोप पार उडाली होती. डोळ्याला डोळा लागत नव्हता. मध्यरात्रीचा प्रहर उलटून गेला होता. महाराजांच्या महालातील दीप अजूनही जळत असल्याचे पाहून त्यांचे चिरंजीव श्रीमान आदित्यराजे महाराजांच्या महालात डोकावून पाहून गेले. त्यांना काही विचारणार तोच महाराजांची विचारमग्न मुद्रा पाहून ते आल्या पावली आपल्या महालाकडे परत गेले.

इकडे उदयजी महाराज आणखी अस्वस्थ होत होते. पाटलीपुत्रहून त्यांचा खास दूत संजय राव यांनी आणलेली राजकीय भूकंपाची वार्ता त्यांच्या कानी पडली आणि महाराजांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटू लागले. त्या रोमांचक अवस्थेत ते एका स्वप्नात रममाण होऊन गेले……

….. राजसिंहासनावर ते विराजमान झाले आहेत. सोळा सुवासिनींकडून त्यांच्या भालप्रदेशावर रेखीव तिलक रेखाटला जातोय, तबकातील एकवीस वातीच्या निरांजनाने त्यांचे औक्षण केले जातेय, शेजारी राणीसरकार आणि चिरंजीव आदित्यराजे मोठ्या कौतुकाने हा राज्यारोहण सोहळा डोळे भरून पाहतायत, महाराजांचे राज्य वेगवेगळ्या जहागिरीत पसरवण्यासाठी जिवाची बाजी लावणारे सरदार, १० हजारी, ५ हजारी मनसबदार, मानकरी स्नेहीमंडळी आपापली  ‘औकात’ ओळखून महाराजांना देण्यासाठी नजराण्याची तबके घेऊन उभे आहेत, अत्यंत विनयपूर्वक सादर केलेल्या तबकांना उदयजी महाराज आपला उजवा हात लावून त्याचा स्वीकार करीत आहेत, राजवाड्यावर लक्ष लक्ष दीपांची रोषणाई केली आहे. त्या प्रकाशात त्यांचा ‘मातोश्रीपूरम’ अक्षरशः उजळून निघाला आहे. संपूर्ण राज्यात हत्तीवरून साखर वाटली जातीये, संपूर्ण राज्याची रयत, आयाबहिणी आनंदाने नाचत आहेत, ‘आपला उदेव राज्या झाला !’  असे म्हणत मीठ मोहरीने हवेतल्या हवेत त्याची दृष्ट काढत आहेत, खासकरून राज्यातील शेतकरी आनंदून गेला आहे. आता आपलं सरकार आलं या आनंदात तो ‘भलरी दादा भलरी!’ असे म्हणत आनंदाने गाऊ नाचू लागला आहे……..

…….. आणि अचानक उदयजी महाराज स्वप्नातून जागे झाले. त्यांनी आसपास नजर टाकली. ते राजसिंहासनावर नाही, तर आपल्या शिसवीच्या लाकडाने घडविलेल्या मंचकावर निजले असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि ते स्वतःशीच पुटपुटले ‘ हाय कंबख्त ! हे स्वप्न होतं तर !’ परंतु आता त्यांनी निश्चय केला.’ बस्स झालं ! आता दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिणे बिल्कुल बंद ! आता खामोश बसायचं नाही तर सगळ्यांना खामोश करून राज्य आपल्या ताब्यात घ्यायचं ! मुकाट्यानं अपमान झेलीत किती दिवस आतल्या आत कुढत बसायचं ? राजीनामास्त्र काढलं पण विरोधक नामोहरम होण्याचं नाव घेत नाहीत ? जे पाटलीपुत्र राज्याच्या नितीशराजेना जमू शकत तर आम्हाला का नाही ?’ असा सवाल त्यांनी स्वतःशीच केला.

लगोलग ते आपल्या महालाबाहेर आले. दारावरचा पहारेकरी हातातल्या भाल्यावर रेलून साखरझोप घेत होता. महाराजांची चाहूल लागताच त्याने महाराजांना घाईघाईने मुजरा केला. उदयजी महाराजांनी त्याकडे दुर्लक्ष करीत त्वरित हुकूम केला " तातडीने आदित्यराजेंच्या दालनात जाऊन त्यांना आम्ही पाचारण केले आहे असे सांग. त्यांना खलबतखान्यात घेऊन ये" तो पहारेकरी पुन्हा एकदा मुजरा करून गेला.

महाराजांनी एवढ्या तातडीने रात्रीच्या प्रहरी आपल्याला कशाला बोलावले आहे याचा विचार करीत आदित्यराजे खलबतखान्यात दाखल झाले. महाराजांना मुजरा करीत आदित्यराजेंनी महाराजांना पुसले, " एवढ्या तातडीनं बोलावणं केलत ? काही विशेष ?"

"होय !" महाराज गंभीर मुद्रेने उत्तरले. " आम्ही आता तातडीने राजीनामा देण्याचा निश्चय केला आहे. आपल्या सरदारांना लगोलग तसा निरोप धाडावा.  त्यांनी परवा आमच्याकडे शिकायत केली होती की राजीनामा खिशात ठेवून त्या कागदाला आता वास येतोय !" उदयजी महाराज उद्वेगाने बोलले. त्यावर आदित्यराजे म्हणाले " होय महाराज ! आपण म्हणताय ते खरं आहे. परवाच्या मुसळधार पावसात सरदार कदमांचा राजीनामा भिजला असं ऐकलं आम्ही, खरं आहे का ते ?"

"हूं !" महाराजांनी नुसताच हुंकार भरला आणि महालातील नक्षीदार खांबाला टेकून ते पुन्हा विचारमग्न झाले. त्यांनी आदित्यराजेंना विचारले " तुमचे काकाश्री काय म्हणतात ? त्यांच्याशी एकदा खलबत करून त्यांच्या मदतीने राज्य स्थापन करावे म्हणतोय"

त्यावर आदित्यराजे काहीच बोलले नाहीत पण त्याचं मनात आले की, ‘काकाश्रींनी यापूर्वी दोनवेळा महाराजांशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव आणला होता. पण उदयजी महाराजांनी त्या प्रस्तावाला खलबत्त्यात घालून कुटले होते. तेंव्हा आता त्यांच्याशी कशी खलबते करता येतील ? शिवाय त्यांची तुटपुंजी फौज आपल्याला कशी पुरेशी पडेल ?’  उदयजी महाराजानी पुन्हा एकदा आदित्यराजेंच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहिले. आदित्यराजे ताडकन उत्तरले " ते कदापि शक्य नाही महाराज. आपण दोनवेळा त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता. ते आपल्याला मदत करतील हे कशावरून ? "

महाराजांनी निराश होऊन खांबावर मूठ आदळली. " ही भाऊबंदकी महाराष्ट्राच्या दौलतील कुठे घेऊन जाणार आहे कुणास ठाऊक ? " असे काहीतरी पुटपुटले.

तेवढ्यात आदित्यराजेंनी महाराजांपुढे एक प्रस्ताव टाकला. " महाराज आपण बारामतीच्या सरदारांची मदत घेतली तर ? नाहीतर थेट दिल्लीला पप्पूराजेंची हातमिळवणी करून त्यांची रसद मागवली तर कसे होईल ?

" मुर्खासारखे बरळू नका !" उदयजी महाराज गरजले. "आमच्या पिताश्रींनी सत्तेसाठी असली लाचारी कधीच पत्करली  नाही ते आम्ही करू म्हणता ? नाही, ते कदापि शक्य नाही " महाराजांनी निक्षून सांगितले. " आमच्या पिताश्रींच्या आत्म्याला स्वर्गामध्ये तक्लीफ होईल असे कृत्य आमच्या हातून होणे नाही " उदयजी महाराज पुन्हा गरजले. जरावेळ खलबतखान्यात विचित्र शांतता पसरली. त्या शांततेचा भंग करीत आदित्यराजेंनी विचारलं " मग पाटलीपुत्राच्या नितीशराजेंनी जे धाडस दाखवले ते तुम्ही दाखवणार नाही तर ? " आदित्यराजेंच्या प्रश्नावर राजे खवळले " खामोश ! आपण कोणासमोर बोलताय याची जाणीव आहे का ? " आदित्यराजे वरमले. तरीही ते धाडस करून बोलले " क्षमा असावी राजे, आमचं एवढंच म्हणणं आहे की, आता राज्यारोहणाची स्वप्ने पाहणे सोडून द्या ! त्यापेक्षा मुंबईच्या दौलतीवर आपली पकड ठेवण्याचा प्रयत्न करू या " यावर महाराज काहीही बोलले नाहीत.

" फक्त आता चिंता एकाच गोष्टीची आहे. जुलै महिना संपत आला. आपले लाडके दूत संजय राव यांनी केलेले राजकीय भूकंपाचे भाकीत खरे होण्याची आशा  आता धूसर होत चालली आहे " महाराज निराशेने उद्गारले.

त्यांनी एक मोठा जड श्वास घेतला. " असो ! सगळ्याच मनीषा पूर्ण होतात असे नाही. अडीच वर्षे वाट पहिली अजून अडीच वर्षे वाट पाहू " असे म्हणत उदयजीराजेंनी मंचकावर स्वतःला लोटून अंगावर पश्तुनी शाल लपेटून घेतली आणि पुन्हा त्या स्वप्नवत दुनियेत रममाण झाले.                        

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.