चांदणी चौकात डंपरची धडक बसून आयटी इंजिनीयर तरुणीसहित 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पुण्यातील चांदणी चौकातील तीव्र उतारावर डंपरच्या झालेल्या धडकेत एका आयटी इंजिनीयर तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर एका 10 वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. तीव्र उतारावर डंपर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये अन्य एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

चांदणी चौकाजवळील जवळील लोहिया जैन आयटी पार्कमध्ये काम करणारी पूजा चव्हाण (वय 23) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. निकीता दत्ता माने (वय 10) हिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. अन्य तरुणी शीतल राठोर (वय 23) हिला सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीव्र उतारावर डंपर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली.

तेजू भिखू राठोड असे वाहन चालकाचे नाव आहे. भरधाव डंपर (एम.एच.12 2494) बाणेर येथून कोथरुडच्या दिशेने येत असताना चांदणी चौक येथे असलेल्या तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटला, डाव्या बाजूने पायी येत असलेल्या तीन मुलींना जाऊन तो धडकला. यामध्ये पूजा हिचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्यावर आसपासच्या नागरिकांनी डंपर चालकाला धरुन पोलिसांच्या ताब्यात दिले. महिलेला धडक दिल्यावर डंपर पुढे गेल्याने तिच्या सोबत असलेल्या अन्य दोघी देखील गंभीर जखमी झाल्या. पोलिसांनी वाहन चालकावर कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.