भेटली तू पुन्हा- हलकी फुलकी प्रेम कथा

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- लग्न हा विषय असा आहे कि तो प्रत्येकाच्या आयुष्यात केंव्हा ना केंव्हा तरी येतोच. लग्नाच्या वयामध्ये कधी फरक असू शकेल पण लग्नासाठी घरच्या आणि नातेवाईकांच्या प्रश्नाला घरातील लग्नाळू मुलाला सामोरे जावे लागतेच. मुलगा शिकला – नोकरीला लागला की घरच्या मंडळींचे मुलगी दाखविण्याचे कार्यक्रम सुरु होतात. लग्नाच्या विचारात तो असला / नसला तरी त्याला मुली पाहण्याच्या कार्यक्रमाला हजर रहावेच लागते. मग तो मुलगा दाखवायला आलेली मुलगी " नापसंत " करून नकार देत असतो. कधी-कधी एकदा पाहिलेली मुलगी पुन्हा कधी भेटली की मग काय होते त्याचा विचार करून ही मध्यवर्ती कल्पना धरून निर्माते सचिन नारकर, विकास पवार यांनी स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा. लि. या चित्रसंस्थे तर्फे " भेटली तू पुन्हा " ह्या सिनेमाची निर्मिती केली आहे.

आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार यांची प्रस्तुती आहे, दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांचे असून कथा-पटकथा-संवाद संजय जमखंडी यांचे आहेत, छायाचित्रण प्रदीप एक खानविलकर, गीते मंगेश कांगणे, संजय जमखंडी, विनय नारायणे यांची असून संगीत चिनार-महेश यांनी दिले आहे. यामध्ये वैभव तत्ववादी, पूजा सावंत, गिरीश ओक, किशोरी अंबिये, अभिजित चव्हाण, मीनल बाळ, गणेश हजारे, विश्वास सोहोनी, भारत सावळे असे अनेक कलाकार आहेत.

ही कथा आहे आलोक भावे या तरुण मुलाची, चांगला शिकलेला, चांगली नोकरी करीत असलेला मुलगा, त्याचे लग्न करायचे हे घरच्यांनी ठरविले आणि त्यांनी त्याला अनेक मुलींचे फोटो सुद्धा दाखविले पण त्याने एक सुद्धा पसंत केली नाही. एक दिवस एक त्याच्या ओळखीचे एक स्थळ त्याला सांगून येते त्या मुलीचे नाव अश्विनी सारंग. मग मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरवला जातो. " कांदे-पोहे " चा कार्यक्रम व्यवस्थित होतो. पण आलोक तिला नकार देतो. त्याचे नेहमीचे रुटीन सुरु होते. एक दिवस आलोकला नोकरीच्या निमित्ताने गोव्याला जायचे असते. प्रवासात आलोकला जी सीट मिळते त्याच्या समोरच्या सीटवर एक मुलगी येऊन बसते आणि ती मुलगी अश्विनी सारंग असते. आता त्याला त्याच मुलीबरोबर गोवा येईपर्यंत प्रवास करायला लागणार असतो, गाडी जशी पुढे जाऊ लागते तसे त्याचे मन बदलू लागते. ह्या मुलीबरोबर बोलायची सुद्धा इच्छा नव्हती असं जर कोणी सांगितलं असतं तर कोणाचा विश्वास बसला नसता, प्रवासात त्यांच्या खूप गप्पा होतात. अलोकला तिचे बोलणे, हसणे, वागणे, खूप लाघवी आणि हवे-हवेसे वाटू लागते. त्यातून त्यातून अनोळखीपणा निघून जाऊन त्यांची मैत्री होते.

आपल्याला आपलं संपूर्ण आयुष्य ज्या व्यक्ती बरोबर घालवायचे आहे, आपली निवड योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी एक तास पुरतो. काही लोकांना पुरत असेलही पण मग बाकीच्यांचे काय ? प्रत्येक नात्याला वेळ मिळालाच पाहिजे. लग्न जमण्यासाठी प्रेम जमणे हे महत्वाचे आहे, काही म्हणतात की लग्न झालं कि आपोआप प्रेम निर्माण होते. नाही जमलं कि " तडजोड " करावी लागते. तडजोड ही नात्याची गरज असावी पण प्रत्येकाची एक " लव्ह स्टोरी " असावी. एखादी व्यक्ती आवडली की पहिल्या भेटीत जन्मोजन्माचे नाते निर्माण होते पण असं असलं तरी एकाच व्यक्तीच्या पुन्हा नव्याने प्रेमात पडण्याची जादू मनाला हळुवार स्पर्श करून जाते.

मुबई-गोवा या प्रवासात पुढे नेमके काय होते ? आलोक – अश्विनीला लग्नासाठी विचारतो का ? अश्विनीच्या मनांत काय भावना असतात ? शेवटी त्यांचे जमते की नाही ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील, वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांनी कामे छान रंगवली आहेत, पूजा सावंत हिने अश्विनीचा अवखळपणा, निरागसपणा इत्यादी भावना छान व्यक्त केल्या आहेत. वैभव तत्ववादीने साकारलेला आलोक मनाला भावतो, पण काही ठिकाणी चित्रपट रेंगाळतो, गाणी ठीक आहेत, बाकी चित्रपट छान रंगवला आहे, एक हलकी-फुलकी प्रेम कथा साकारलेली आहे,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.