लोणावळ्यात पर्यटकांच्या संख्येत घट

एमपीसी न्यूज – शनिवार व रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची संख्या घटल्याचे चित्र पाहायला मिळाले. दोन्ही दिवस वाहनांची व पर्यटकांची संख्या तुलनेने फारच कमी असल्याने लोणावळा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त होता. धरणाकडे जाणारे मार्ग देखील मोकळे पाहायला मिळाले. पावसाने देखील चांगली उघडीप दिली आहे.

पावसाळा सुरु झाल्यापासून लोणावळ्यात दर शनिवार व रविवारी पर्यटकांची तुंबळ गर्दी होत होती. यामुळे शनिवार व रविवार स्थानिकांना घराबाहेर पडणे अवघड होत असल्याने संताप व्यक्त केला जायचा. भुशी धरण व लायन्स पाँईटकडे जाणार्‍या मार्गावर तब्बल चार ते पाच किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागत होत्या. आज मात्र या उलट परिस्थिती पाहायला मिळत होती. मागील दोन शनिवार व रविवार तर जोरदार पावसामुळे भुशी धरणाच्या पायर्‍य‍ांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती.

आता पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाच्या पायर्‍यांवर जाण्याचे निर्बंध उठवण्यात आल्याने पर्यटक धरणाच्या पायर्‍यांवर बसून भिजण्याचा मनसोक्त आनंद घेत होते. रस्ते वाहतूक कोंडीमुक्त असले तरी भुशी धरण व लायन्स पाँईट परिसरात पर्यटकांची चांगली गर्दी होती. पवन मावळ, ग्रामीण भागातील कार्ला, भाजे लेणी व धबधबा, लोहगड किल्ला परिसरात देखील पर्यटकांची संख्या आज तुलनेने कमी होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.