तब्बल वीस वर्षानंतर सुचित्रा बांदेकर रंगभूमीवर

एमपीसी न्यूज – रंगभूमीवर काम केलेला कलाकार नाटकांपासून फार काळ दूर राहू शकत नाही. अनेक गाजलेल्या मालिका तसेच चित्रपटांमुळे लोकप्रिय झालेल्या सुचित्रा बांदेकरही 20 वर्षांनी पुन्हा रंगभूमीकडे वळल्या आहेत. डॉ. विवेक बेळे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘कुत्ते कमीने!’ या नाटकात सुचित्रा एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

रंगभूमीपासून आपली कारकीर्द सुरू करणारे बरेचसे कलाकार चित्रपट-मालिकांमध्ये काम केल्यानंतर पुन्हा नाटकांकडे वळल्याचे आपण नेहमीच पाहत आलो आहोत. ‘हम पांच’ या गाजलेल्या हिंदी मालिकेद्वारे छोटा पडदा गाजवल्यानंतर मोठ्या पडद्यावर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सारख्या मराठी चित्रपटापासून ‘सिंघम’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका सुचित्रा यांनी पार पाडल्या आहेत. जवळजवळ 20 वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या ‘वा-यावरची वरात’ या नाटकानंतर त्या मालिका आणि चित्रपटात बिझी झाल्या होत्या.

‘कुत्ते कमीने!’च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत त्या म्हणाल्या की, जरी 20 वर्षांनी पुन्हा नाटकात काम करीत असले तरी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. मध्यंतरीच्या काळात चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करण्यासोबतच निर्मितीच्या कामातही व्यग्र असल्याने रंगभूमीवर काम करू शकले नव्हते. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतीक्षेत होते. ‘कुत्ते कमीने!’च्या माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होत आहे.

विवेक बेळेंसारख्या लेखकाच्या लेखणीतून आकाराला आलेल्या आणि चंद्रकांत कुलकर्णींसारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली तयार होणा-या नाटकाद्वारे पुन्हा नाट्यरसिकांची सेवा करण्याची संधी मिळणे ही खूप आनंदाची गोष्ट असल्याचे सुचित्रा सांगतात. ‘होम मिनिस्टर’ फेम आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर असलेल्या सुचित्रा सध्या ‘कुत्ते कमिने!’च्या तालमीत रमल्या असून नाट्यरसिकांना आपली भूमिका नक्कीच आवडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जिगिषा व अष्टविनायक निर्मित हे नाटक ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात रंगभूमीवर येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.