नाला दुरुस्तीच्या कामाचे चाकण नगरपरिषद प्रशासनाला संतप्त कार्यकर्त्यांकडून स्मरणपत्र

तीव्र आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – चाकण शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्यालगत येथील मुस्लीम दफनभूमी समोरून वाहणारा रस्त्यालगतचा नाला अत्यंत धोकादायक झाला असून येथे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासनाकडे याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात आल्या आहेत. मुख्याधिका-यांनी तातडीने संबंधित काम मार्गी लावण्याचे पोकळ आश्वासन देऊन कित्येक महिने लोटले असले तरी प्रत्यक्षात काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित काम मार्गी लागत नसल्याने येथील कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांना सोमवारी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत स्मरणपत्र देऊन पोकळ आश्वासनाची आठवण करून दिली आहे.

चाकण शहरातील अनेक नाल्यांमध्ये टाकण्यात आलेल्या बांधकाम साहित्यामुळे आणि अनेक दिवस कचरा तसाच साचून राहिल्यामुळे नाल्यांचे प्रवाह बंद झाले आहेत. अस्ताव्यस्त टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यापासून कुठलाही नैसर्गिक घटक वाचू शकलेला नाही.  भूखंडांप्रमाणे आता मोठमोठे नालेही या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे कधीकाळी प्रवाही असलेले मोठमोठे ओढे-नालेही चाकण शहरात अनेक ठिकाणी मोठमोठ्या इमारतींना अडसर ठरल्याने अस्तित्व हरवून बसले आहे. चाकण शहरातील काळूस रस्त्यालगतच्या मुस्लीम दफनभूमीच्या समोरील भागात उघड्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून उघड्या नाल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना आणि पादचा-यांना अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.

या रस्त्यावरून विद्यार्थी, नोकरदार, चाकण मार्केटमध्ये येणारे शेतकरी यांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी या नाल्याची स्थिती नगरपरिषद प्रशासनाच्या समोर मांडण्यात आली होती. मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी तातडीने संबंधित काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांचे ते आश्वासन बोलाची भात आणि बोलाची कढी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी साबळे यांना स्मरणपत्र देऊन तातडीने काम करण्याची मागणी केली आहे. 

पुढील काळात हे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा चाकण पतसंस्थेचे माजी अध्यक्ष समीर सिकीलकर, नगरसेविका हुमा जहीर शेख, राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष सरफराज सिकीलकर, अजित सिकीलकर, भारिप बहुजन महासंघाचे संतोष जाधव, अशोक गोतारणे, सतीश आगळे, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते निलेश कड-पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड आदींसह परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.