भारतीयम 2017 टेक फेस्ट, महाराष्ट्र-गोवा परिषदेचे उद्घाटन

भारतीय अभियांत्रिकीला भविष्यात चांगले दिवस – प्रतापसिंह देसाई

 

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ आणि ‘इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन’ आयोजित महाराष्ट्र-गोवा राज्यातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या 2 दिवसीय टेक फेस्ट आणि परिषदेचे उद्घाटन आज शुक्रवारी सकाळी भारती विद्यापीठाच्या धनकवडी कॅम्पसमध्ये झाले.

बीएसएनएलचे प्रधान सरव्यवस्थापक डी  सी  द्विवेदी आणि ‘इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, भारती विद्यापीठ ‘कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. भारती विद्यापीठचे सहसचिव एम. एस. सगरे उपस्थित होते. महाराष्ट्र आणि गोवा येथून 5 हजार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची उपस्थिती या वार्षिक परिषदेला होती.

‘डिजिटल इंडिया’ ही या वर्षीच्या वार्षिक भारतीयम आणि परिषदेची संकल्पना होती. टेकविप-2 च्या सहकार्याने सुरू झालेल्या या परिषदेत चांगली कामगिरी करणा-या  अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

‘जगाला 120 कोटी टेक्नोक्रेट्सची गरज आहे. त्यातील 16 लाख अभियंते भारतात तयार होतात. सेवा क्षेत्र आणि निर्मिती क्षेत्रातील भारत हे आगामी काळात महत्वाचे केंद्र होणार आहे. त्यामुळे भारतातील अभियांत्रिकीला पुढील काळात उज्वल भविष्य आहे’ असे मत ‘इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन’ (दिल्ली)चे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई यांनी केले.

डी सी द्विवेदी यांनी डिजिटल इंडिया’ संकल्पनेत बीएसएनएलच्या योगदानाची माहिती दिली. ‘डिजिटल इंडिया’मध्ये अभियांत्रिकी करियर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांना मोठ्या संधी आहेत असे त्यांनी सांगितले. डॉ. आनंद भालेराव यांनी दोन दिवसीय परिषद, भारतीयम आणि भारती विदयापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्याची माहिती प्रास्ताविकात दिली.

या परिषदेत मॉक प्लेसमेंट, डिजिटल इंडिया संकल्पनेशी निगडित प्रकल्प, रोबो सॉकर, रोबो कार, विविध संशोधनपर पेपर्सचे सादरीकरण, स्पर्धा, दृष्टिहीनसाठी तयार केलेल्या सेन्सर युक्त काठ्यांचा डिस्प्ले, आर्ट सर्कलचे सांस्कृतिक कार्यक्रम, दुर्मिळ कोर्सचे फोटो प्रदर्शन असे 22 उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.