अमरावती, (संजय शेंडे, प्रतिनिधी) : देशातील
लोकसभा निवडणुकीचे
सातही टप्पे पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. चार पोलस्टर्सच्या एक्झिट पोलच्या निकालांची सरासरी दाखवते की भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 365 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला सुमारे 142 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्ष किंवा अपक्षांना जवळपास 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वांची सरासरी काढली तर 50-50 जागा दाखवते. दरम्यान, या एक्झिट पोलच्या निकालावर प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एक्झिट पोल म्हणजे थोतांड : बच्चू कडू
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पुन्हा सत्तेत येताना पाहायला मिळत आहे. यावर बच्चू कडू यांनी टीका केली आहे. 4 तारखेला निकाल आणि एक्झिट पोल आज दाखवता हे कसं चालतं? आम्ही अमरावतीमध्ये निवडून येणार आहे, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. धर्म आणि जातीच्या आधारावर प्रचार झाला आहे. या पलीकडे कोणते मुद्दे वापरले? लोकसभेला आमचा उमेदवार दिला. मात्र, विधानसभेला त्यांनी बंदुका तोफा झाडल्या तर आम्हीही झाडणार, युतीत असलो म्हणजे गुलाम नाहीत, त्यांनी युतीचा धर्म पाळावा आम्ही पाळू, असा इशारा बच्चू कडू यांनी महायुतीला दिला.
राणा दाम्पत्यावर बच्चू कडू यांचा घणाघात
राणा दाम्पत्याबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले, की या निवडणुकीच्या निकालानंतर स्वयंभू नेते लवकरच संपतील. ते खूप मोठे नेते आहेत, ते काहीही बोलू शकतात. निकालानंतर उद्धव ठाकरे 15 दिवसात सत्तेत दिसतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. यावर बोलताना कडू म्हणाले, की आधी ते बघा कुठे आहेत, बायको भाजपमध्ये आणि हा स्वतःच्या संघटनेत त्याला तरी माहीत आहे का तो कुठे आहे? असा टोला बच्चू कडू यांनी राणांना लगावला. सर्वे खोटे आहेत, मी अंदाज सांगायला काय ज्योतिषी नाही. मात्र, आमचा उमेदवार निवडून येणार, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
वाचा –
लोकसभा निकालानंतर भाजप भाकरी फिरवणार; कोण होणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?
पुन्हा एकदा मोदी सरकार?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. सत्ताधारी भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळण्याची आशा आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने या निवडणुकीच्या मोसमात “400 पार” करण्याचा नारा दिला असताना, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी भारतीय जनता पक्ष किमान 295 लोकसभा जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.