अमरावती, (संजय शेंडे, प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेतल्या काही आमदारांसह ते सूरत गेले. ही संख्या नंतर 40 वर गेली. शिवसेनेचे 40 आमदार काही अपक्ष आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पोहचले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या संपूर्ण घटनाक्रमात प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांचाही सहभाग होता. या संदर्भात आता बच्चू कडू यांनी मोठा खुलासा केला आहे. गुवाहाटीला जाण्यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता असं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंशी फोनवर काय चर्चा झाली?
मी गुवाहाटीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तेव्हा त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती. बरेच आमदार गुवाहाटीला पोहोचले होते. आपण जाताना एक फोन ठाकरे यांना केला पाहिजे, असं वाटलं. मी फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला पण ते बोलू शकले नाही, नंतर मी फोन ठेवून दिला, असा खुलासा बच्चू कडू यांनी केला. ते पुढे म्हणाले, ठाकरेंसोबत आमचे धुऱ्याचे भांडण नाही. घराचे भांडण नाही, आमचे राजकीय आहे, या पाच वर्षात एक कॉमन गोष्ट पाहिली की बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व पक्षाच्या बॅनरवर दिसला. राजकारणामध्ये कोणी कोणाचा दुश्मन नाही, भाऊ नाही. राजकारण हे जनतेने मनावर घेण्याची गोष्ट नाही. त्यांनी मतदानाच्यावेळी मनावर घेतलं पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले.
वाचा –
‘रवी राणांमुळे लोकसभेत नवनीत राणा पडणार’ निकालाआधीच बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
रवी राणा नवनीत राणा यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार : बच्चू कडू
सार्वजनिक जीवनात प्रहारचे उमेदवार दिनेश बुब हे रवी राणांपेक्षा लाख पटीने चांगले आहेत. तर नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर रवी राणांचा असेल. नवनीत राणांच्या पराभवाचे सर्वात मोठे श्रेय ही रवी राणांना जाईल, असेही बच्चू कडू म्हणाले. एकट्या रवी राणामुळे आम्ही निवडणुकीमध्ये उभे राहिलो असं नाही, निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला ह्या स्लोगनला आम्हाला समोर न्यायचं होतं. अमरावती जिल्ह्यामध्ये आमची काय ताकद आहे? आम्ही कशी बाजी पलटवू शकतो, ती अजूनही मतपेटीमध्ये बंद आहे, निकाल आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही ही निवडणूक जिंकणार आहे, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.